अजित पवार यांच्यावर छापे : राजकीय `क्रोनोलाॅजी` समजून घ्या...
अजित पवारsarkarnama

अजित पवार यांच्यावर छापे : राजकीय `क्रोनोलाॅजी` समजून घ्या...

अजित पवार (Ajit Pawar) यांना टार्गेट करण्यामागे राजकीय स्फोट घडण्याची चिन्हे?

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित नातेवाईक, मित्र, कारखाने यांच्यावर केंद्रीय यंत्रणांनी छापे पडल्याने त्याचे मोठे राजकीय पडसाद उमटले. एकेकाळी भाजपसोबत जाऊन पहाटेच्या वेळी शपथविधी घेणारे अजितदादा हे आता भाजपच्या हिटलिस्टवर का आले आहेत, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

अजित पवार यांना अर्थमंत्री म्हणून केंद्र सरकारने नुकतीच मोठी जबाबदारी दिली होती. विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या परिषदेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात आले. त्यानंतर लगेचच काही दिवसांत ही कारवाई झाली. अजितदादांबाबत भाजपकडून `कॅरट अॅंड स्टिक` असे तर धोऱण ठेवलेले नाही ना, अशी शंका त्यामुळे राजकीय नेत्यांत घेतली जात आहे.

अजित पवार
जरंडेश्वर कारखान्याचा मालक कोण; अजित पवारांनी उत्तर द्यावे....

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आधी आरोपांची राळ उठविणे, त्यानंतर यंत्रणांनी छापे मारणे असा आता घटनाक्रम ठरून केला आहे. अजित पवार यांनी काही साखर कारखाने घेतल्याने त्यावरून वाद सुरू झाला आहे. पण केवळ आर्थिक गैरव्यवहारापुरतेच ही छापेमारी असेल, असे राजकीय वर्तुळातील अनेकांना वाटत नाही. कारण जलसिंचन घोटाळ्यातून अजितदादांना भाजपचे 2019 मध्ये तीन-चार दिवसांचे सरकार असतानाच क्लिन चिट मिळाली होती. ही क्लिन चिट मिळवून देण्यात लालचुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन प्रमुख परमबीरसिंग यांची मोठी भूमिका होती. तेच नंतर मुंबईचे पोलिस आयुक्त झाले आणि त्यांनीच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना अडचणीत आणून राष्ट्रवादीचे टेन्शन वाढविले.

अजित पवार
माझ्या बहिणींच्या कारखान्यांवर का छापे टाकले ?

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली तरी ते भाजपला अद्याप घालवता आलेले नाही. ही घालमेल भाजपला लपवता आलेली नाही. शिवसेनेतील अनेक नेेते केंद्रीय यंत्रणांच्या कार्यालयांचे उंबरे झिजवत आहेत. तरीही शिवसेना अद्याप या दबावाला बळी पडल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आता हा मोर्चा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे वळविल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हसन मुश्रीफ आणि त्यानंतर अजित पवार अशा दोन्ही नेत्यांवर सोमय्या यांनी आरोप केले होते. त्यातील पवार यांना लगेच छापेमारीला सामोरे जावे लागले आहे. मुश्रीफ यांना विधानसभा निवडणुकीच्या आधीच अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. तेव्हा त्यांच्या कागल येथील घरावर केंद्रीय यंत्रणांनी तपासणी केली होती. सोमय्या यांच्या आरोपानंतर मुश्रीफ यांच्यावर पुन्हा छापा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अजित पवार यांच्या बहिणींच्या घरीही छापे मारल्याने त्याची जास्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीतून उमटली आहे. स्वत: अजितदादांनी त्यावर तीव्र भावना व्यक्त केली. सूडाचे राजकारण कोणत्या थराला गेले आहे, असे शब्द त्यांनी वापरले. एकूणच अजित पवार यांच्या माध्यमातून भाजपला काही राजकीय हेतू साध्य तर करायचा नाही ना, अशी शंका आता राजकीय वर्तुळात येत आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी या दबावाला कसे तोंड देतात आणि भाजपच्या ताब्यातील यंत्रणा या कारवाया कोणत्या स्तरापर्यंत तडीला नेतात, हे पाहणे आवश्यक ठरणार आहे.

यावर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ज्याने चुकीचे केले त्याला शिक्षा व्हायला हवी याबाबत कोणी दुमत व्यक्त करणार नाही. पण सत्ताधारी पक्षाच्या सोयीची राजकीय भूमिका घेतल्यानंतर या यंत्रणा हे विषय कारवाईच्या स्तरापर्यंत नेतात का हे पाहायला हवे. या छापेमारीतून खरेच मोठा गैरव्यवहार हाती लागला तर यंत्रणांनी तो व्यवस्थित सिद्ध होईपर्यंत त्यासाठी कष्ट घ्यावेत. अन्यथा काहीतरी राजकीय स्फोट घडवून आणण्यासाठी तर ही छापेपारी नाही ना, अशी शंका उपस्थित झाली ती चुकीच नव्हती, असा संदेश जाईल.

अजित पवार
'ठाकरे सरकार इलेव्हन''ची यादी वाढणार : सोमय्या;पाहा व्हिडिओ

अजित पवार काय म्हणाले होते?

आयकर विभागाने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा अधिकार आहे. जर त्यांना कुणावर शंका-कुशंका आली तर ते छापेमारी करु शकतात. माझ्याशी संबंधित असलेल्या काही कंपन्यावर छापेमारी झाली आहे. मी स्वतः राज्याचा अर्थमंत्री असल्यामुळे आर्थिक शिस्त लावण्यासाठी कुठलाही कर न चुकवता, सगळे कर वेळेवर भरण्याला मी प्राधान्य देतो. माझ्याशी संबंधित असलेल्या सर्व कंपन्यांचे कर व्यवस्थित आणि वेळेवर भरले जातात. त्यात कुठलीही अडचण येत नाही. तरी आयकर विभागाने राजकीय हेतून आमच्या कंपन्यांवर धाड टाकली की आयकर विभागाला आणखी काही माहिती हवी होती? याबद्दल आयकर विभागच माहिती देऊ शकतो, असे प्रतिपादन अजिता पवार यांनी केले.

माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर धाड टाकली त्याबद्दल मला काहीच म्हणायचे नाही. मात्र माझ्या बहिणींच्या कंपन्यांवरही धाडी टाकण्यात आल्या आहेत. माझ्या तीनही बहिणींची लग्न तीस-चाळीस वर्षांपूर्वी झालेले आहे. त्या त्यांच्या संसारात गुंतलेल्या आहेत. मग त्यांच्यावर धाडी टाकण्याचे कारण मला समजू शकलेले नाही. अजित पवारचे नातेवाईक म्हणून या धाडी टाकल्या असतील तर कुठल्या स्तरावर जाऊन राजकारण सुरू आहे, वेगवेगळ्या संस्थांचा वापर कसा केला जात आहे, याचा राज्यातील जनतेने याचा नक्कीच विचार केला पाहिजे, असे अजितदादा म्हणाले.

Related Stories

No stories found.