The issue of Nanar for Shiv Sena is over | Sarkarnama

शिवसेनेसाठी नाणार हा विषय संपलेला आहे...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 ऑगस्ट 2020

सी-वर्ल्ड प्रकल्पाला आमचा विरोध नाही. तेथील स्थानिकांचा विरोध आहे. त्यांनी सहमती दिली तरच हा प्रकल्प होईल.

ओरोस :  मालवण वायंगणी-तोंडवळी येथील नियोजित सी-वर्ल्ड प्रकल्प कमीत-कमी जागेत उभारण्यास शिवसेना तयार आहे; पण त्यासाठी स्थानिकांनी सहमती दिली पाहिजे. ही सहमती मिळाली तर आम्ही शासकीय अथवा खासगी संस्थेमार्फत हा प्रकल्प उभारू, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाणार हा विषय शिवसेनेसाठी संपलेला आहे. काही जण हा विषय पुन्हा काढून अस्तित्वासाठी प्रयत्न करीत आहेत, असा टोला सामंत यांनी यावेळी लगावला.

पालकमंत्री सामंत म्हणाले, ""शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी पक्षप्रमुख म्हणून यापूर्वीच नाणारविरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदार भास्कर जाधव यांनी या प्रकल्पाचे समर्थन केले तरी हा प्रकल्प होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे; मात्र सी-वर्ल्ड प्रकल्पाला आमचा विरोध नाही. तेथील स्थानिकांचा विरोध आहे. त्यांनी सहमती दिली तरच हा प्रकल्प होईल.''

सामंत काल एक दिवसाच्या दौऱ्यावर जिल्ह्यात आले होते. त्यांनी जिल्ह्याचे प्रशासन व सरपंच यांच्यासमवेत गणेशोत्सव नियोजन व कोरोना आढावा बैठक घेतली. यानंतर दुपारी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. कोकणातील प्रकल्पांना शिवसेना नेहमीच विरोध करीत आली आहे. त्यांचा हा विरोध राजकीय फायद्यासाठी असल्याचा आरोप होत असल्याकडे लक्ष वेधले असता, पालकमंत्री सामंत म्हणाले, ""मी माझ्या मतदारसंघात पर्यटनावर आधारित पाच प्रकल्प आणले आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकणात पर्यटन प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे.'' यावर सिंधुदुर्गातही असे प्रकल्प आणा, असे सांगितले असता ते म्हणाले, ""या जिल्ह्यात प्रकल्प आणणारे थकले आहेत. त्यामुळे मलाच आता येथे प्रकल्प आणावे लागतील.''

खासदार नारायण राणे यांच्या पडवे येथील मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना तपासणी केंद्र सुरू होत असल्याकडे लक्ष वेधले असता पालकमंत्री सामंत यांनी, जिल्ह्यात जनतेच्या फायद्यासाठी एखादी सुविधा कोणीही उभी केल्यास त्याचे कौतुकच केले पाहिजे; मात्र त्यांनीही अशा सुविधा दुसऱ्यांनी सुरू केल्यास त्यांचे कौतुक करण्यास शिकावे, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी भाजपच्या रवींद्र चव्हाण यांनी उदय सामंत भाजपमध्ये येतील, अशा केलेल्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता मंत्री सामंत यांनी चव्हाण हेच शिवसेनेत येतील, असा दावा केला.
Edited  by : Mangesh Mahale  

हेही वाचा : योगी आदित्यनाथ प्रथम ; उद्धव ठाकरे 'या' क्रमांकावर 
 मुंबई :  देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांनी सातवे स्थान पटकावले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. योगींनी सलग तिसऱ्यांदा सर्वोच्च स्थान मिळविले आहे. विशेष म्हणजे भाजप आणि काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता जास्त दिसून आली आहे. एका सर्वेक्षणातून पुढे आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्या; तर उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख