परमबीरसिंगांचा लेटरबॉम्ब : गृहमंत्री देशमुखांकडून वाझेंना दरमहा शंभर कोटींच्या वसुलीचे टार्गेट - ips officer param bir singh writes letter to cm against home minister anil deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

परमबीरसिंगांचा लेटरबॉम्ब : गृहमंत्री देशमुखांकडून वाझेंना दरमहा शंभर कोटींच्या वसुलीचे टार्गेट

वृत्तसंस्था
शनिवार, 20 मार्च 2021

मुंबईच्या आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आलेले परमबीरसिंग यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांच्या विरोधात लेटरबॉम्ब टाकला आहे. 

मुंबई : निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणात खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. या प्रकरणात मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीरसिंग यांची उचलबांगडी करण्यात आली होती. आता परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पत्र लिहिले असून, यात गृहमंत्र्यावरच खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. गृहमंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा धक्कादायक आरोप परमबीरसिंग यांनी केला आहे. 

राज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीरसिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. अनिल देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. मागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना निधी गोळा करण्यासाठी सांगत. 

फेब्रुवारीच्या मध्यात गृहमंत्र्यांनी वाझेंना बोलावून घेतले होते. त्यावेळी गृहमंत्र्यांचे दोन कर्मचारीही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी वाझेंना महिन्याला 100 कोटींचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट गाठण्यासाठी त्यांनी मुंबईत 1 हजार 750 बार,  रेस्टॉरन्ट आणि इतर आस्थापना असून, प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये जमा करावेत, अशी सूचना केली होती. यातून 40 ते 50 कोटी जमा करावेत आणि उरलेले इतर मार्गांना जमा करावेत, असे त्यांनी सांगितले, असा आरोप परमबीरसिंग यांनी केला आहे. 

अँटिलिया प्रकरणाची माहिती देण्यासाठी या महिन्यातच मी वर्षा बंगल्यावर तुम्हाला भेटलो होतो. त्यावेळी मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट  आणि चुकीच्या कामांबद्दल माहिती दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  आणि इतर ज्येष्ठ मंत्र्यांच्या कानावरही मी हे घातले होते. काही मंत्र्यांना हे आधीपासून माहिती असल्याचे त्यावेळी मला लक्षात आले होते, असा दावाही परमबीरसिंग यांनी केला आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख