भारतातील कोरोना चाचण्या चुकीच्या अथवा बिनभरवशाच्या! - indias covid tests are inaccurate or unreliable says australia | Politics Marathi News - Sarkarnama

भारतातील कोरोना चाचण्या चुकीच्या अथवा बिनभरवशाच्या!

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 एप्रिल 2021

भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतीय नागरिकांना नो-एंट्री केली असून, कोरोना चाचण्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाने भारताच्या विमानांना आजपासून 15 मेपर्यंत बंदी केली आहे. भारतीय कोरोना चाचण्या चुकीच्या अथवा बिनभरवशाच्या आहेत, असे ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. भारताच्या कोरोना चाचण्यांबद्दल अतिशय गंभीर दावा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

भारतातून ऑस्ट्रेलियात गेलेले प्रवासी तिथे पोचल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. भारतातून परतलेले चार जण नुकतेच पॉझिटिव्ह आल्याची घटना पर्थमध्ये घडली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना पश्चिम ऑस्ट्रेलिया राज्याचे प्रमुख मार्क मॅकगोवन म्हणाले की, ऑस्ट्रेलियात येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचण्या भारतात केल्या जात आहेत. एक तर या चाचण्या चुकीच्या अथवा बिनभरवशाच्या आहेत. कारण ऑस्ट्रेलियात परतल्यानंतर प्रवासी पॉझिटिव्ह आढळत आहेत. भारतात चाचण्या सदोष असतील तर त्याचा परिणाम ऑस्ट्रेलियात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यात होऊ शकतो.  

भारतात कोरोना चाचणी करुन विमानात बसलेला प्रवासी ऑस्ट्रेलियात पोचल्यानंतर पॉझिटिव्ह कसा येतो, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. भारतातून परतणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले असून, यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली. ऑस्ट्रेलियात परतलेले 79 प्रवासी पॉझिटिव्ह आढळले असून, त्यातील 78 प्रवासी हे भारतातून आलेले होते. 

हेही वाचा : ऑस्ट्रेलियातून एअर इंडियाचे विमान एकही प्रवासी न घेता परतले 

ऑस्ट्रेलियाने भारताच्या प्रवासी विमानांवर 15 मेपर्यंत बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ऑस्ट्रेलियाच्या गृहमंत्री केरन अँड्य्रूज म्हणाल्या की, भारतातील स्थिती अतिशय भयावह आहे. दररोज लाखो रुग्ण भारतात सापडत असून, हजारो जणांचा मृत्यू होत आहे. भारतातील स्थिती खूप बिघडलेली असून, या कठीण काळात ऑस्ट्रेलियाकडून भारताला मदत केली जाईल. भारताला व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच, भारतातून परतणारे नागरिक कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याचाही मुद्दाही उपस्थित झाला आहे.  

भारतात 24 तासांत 3 लाख 23 हजार रूग्ण 
भारतात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 23 हजार 144 रुग्ण सापडले असून, 2 हजार 771 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 76 लाख 36 हजार 307 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 97 हजार 894 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 28 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 28 लाख 82 हजार 204 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 16.34 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 82.54 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 45 लाख 56 हजार 209 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.12 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख