Corona Alert : देशातील कोरोना मृत्यूंपैकी 25 टक्के महाराष्ट्रातील - in india total covid deaths 25 percent are from maharashtra state | Politics Marathi News - Sarkarnama

Corona Alert : देशातील कोरोना मृत्यूंपैकी 25 टक्के महाराष्ट्रातील

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 एप्रिल 2021

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. मागील 24 तासांत दोन हजारहून अधिक जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 3 लाख 14 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 2 हजार 104 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील कोणत्याही देशात आतापर्यंत एका दिवसांत नोंदवण्यात आले नाहीत तेवढे रुग्ण भारतात मागील 24 तासांत आढळले आहेत. देशात मागील 24 तासांत कोरोनाने झालेल्या मृत्यूंपैकी सुमारे 25 टक्के महाराष्ट्रातील आहेत. 

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 59 लाख 30 हजार 965 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 84 हजार 657 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 14 हजार रुग्ण सापडले, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात मागील 24 तासांत 2 हजार 104 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. यातील 81.08 टक्के मृत्यू हे दहा राज्यातील आहेत. मागील 24 तासांत देशात झालेल्या मृत्यूंपैकी 568 म्हणजेच तब्बल 25 टक्के मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली 249, छत्तीसगड 193, उत्तर प्रदेश 187, गुजरात 125, कर्नाटक 116, मध्य प्रदेश 75, पंजाब 69, राजस्थान 62, झारखंड 62 असे मृत्यू झाले आहेत.  

हेही वाचा : 18 वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना लशीची नोंदणी शनिवारपासून सुरू 

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 22 लाखांवर गेली आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या सलग 43 व्या दिवशी वाढली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 22 लाख 91 हजार 428 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 14.38 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 84.46 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 34 लाख 54 हजार 880 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.16 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख