सावधान : देशात ब्लॅक फंगसचे 11 हजार 717 रुग्ण; गुजरात, महाराष्ट्र अन् आंध्रात सर्वाधिक - india reports more than 11 thousand cases of mucormycosis | Politics Marathi News - Sarkarnama

सावधान : देशात ब्लॅक फंगसचे 11 हजार 717 रुग्ण; गुजरात, महाराष्ट्र अन् आंध्रात सर्वाधिक

वृत्तसंस्था
बुधवार, 26 मे 2021

कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना म्युकरमायकोसिस हा आजार होत असल्याने देशाची चिंता वाढू लागली आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा (Covid19) कहर वाढत असून, यात आता नवीन आजाराची भर पडली आहे. काळी बुरशी (Black Fungus) म्हणजेच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) हा जीवघेणा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे. या आजाराचे रुग्ण देशभरात वेगाने वाढू लागले असून, अनेक जणांचा मृत्यूही झाला आहे. देशात आजच्या घडीला या आजाराचे 11 हजार 717 रुग्ण असून, सर्वाधिक रुग्ण गुजरात राज्यात आहेत. 

म्युकरमायकोसिसचे रुग्ण वेगाने वाढू लागल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यांना हा साथीचा रोग जाहीर करण्याची सूचना केली होती. तसेच, या आजाराच्या रुग्णांचा आकडे केंद्राकडे सादर करण्यास सांगितले आहे. कोरोना संकटामुळे आधीच कोलमडून पडलेल्या आरोग्य व्यवस्थेसमोर आता म्युकरमायकोसिसचे आव्हान निर्माण झाले आहे. 

केंद्रीय रसायने व खते मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात आजपर्यंत म्युकरमायोसिसचे 11 हजार 717 रुग्ण आढळले आहेत. यात गुजरातमध्ये सर्वाधिक 2 हजार 859 रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्रात 2 हजार 770 रुग्ण सापडले आहे. आंध्र प्रदेशात 768 रुग्ण आढळून आले आहेत. देशातील म्युकरमायकोसिसच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण या तीन राज्यांत आहेत. दिल्लीतही याची रुग्णसंख्या वाढत असून, आतापर्यंत 620 रुग्ण सापडले आहेत. 

म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णसंख्येचा सरकारने आढावा घेतला आहे. हा आढावा घेतल्यानंतर राज्ये आणि केंद्रशासित अॅम्फोटेरीसिन-बीच्या 29 हजार 250 व्हाईल्स देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक राज्यातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेच व्हाईल्सचा पुरवठा करण्यात आला आहे, असे गौडा यांनी सांगितले. 

हेही वाचा : बाप रे...एकाच रुग्णाला ब्लॅक, व्हाईट अन् यलो फंगसचा संसर्ग 

म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्यानंतर रुग्ण काही दिवसांत दगावतो. हा आजार संसर्गजन्य नसल्याचे 'सीडीसी'चे म्हणणे आहे. भारतात या आजाराचे दरवर्षी सुमारे डझनभर रुग्ण सापडतात. सर्वसाधारणपणे शरीर अशा प्रकारच्या बुरशीला प्रतिकार करते. परंतु, प्रतिकारशक्ती कमकुवत असलेले याची शिकार होतात. अवयव प्रत्यारोपण करणारे आणि कर्करुग्णांमध्ये हा आजार आधी प्रामुख्याने आढळून येत होता. याआधी सार्सची साथ आली होती त्यावेळी या आजाराचे काही रुग्ण सापडले होते. देशात आतापर्यंत या आजारामुळे दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख