मृत्यूचे तांडव थांबेना : भारतात दर मिनिटाला तीन जणांचा कोरोनामुळे जातोय जीव - india records more than four thousand COVID 19 fatalities in single day | Politics Marathi News - Sarkarnama

मृत्यूचे तांडव थांबेना : भारतात दर मिनिटाला तीन जणांचा कोरोनामुळे जातोय जीव

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 मे 2021

देशातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असली तरी या वाढीचा वेग आता कमी होऊ लागला आहे. असे असताना मृत्यूचे आकडे वाढतच आहेत. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19)  रुग्णसंख्येतील (Patients) वाढ सुरूच असली तरी या वाढीचा वेग आता कमी होऊ लागला आहे. नवीन रुग्णसंख्या कालपासून 3 लाखांच्या खाली आली आहे. देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2 लाख 63  हजार 533 नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 329 जणांचा मृत्यू (Covid Deaths) झाला आहे. भारतात दर मिनिटाला तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. 

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 52 लाख 28 हजार 996 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 78 हजार 719 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून 21 एप्रिलनंतर कालपासून (ता.17 मे) रोजची रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. तरीही मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा : कोरोना लस घेण्यासाठी मनोरुग्णांना आता ओळखीच्या पुराव्याची गरज नाही 

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असून, आता ती 33 लाखांवर आली आहे. सक्रिय रुग्णांची जास्त असल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 33 लाख 53 हजार 765 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 13.29 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 85.60 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 15 लाख 96 हजार 512 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.10 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख