जगात सर्वाधिक कोरोना मृत्यू भारतात; दर मिनिटाला तिघांचा मृत्यू - india records highest covid19 death toll in the world in last 24 hours | Politics Marathi News - Sarkarnama

जगात सर्वाधिक कोरोना मृत्यू भारतात; दर मिनिटाला तिघांचा मृत्यू

वृत्तसंस्था
बुधवार, 19 मे 2021

देशातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढीचा वेग आता कमी होऊ लागला आहे. परंतु, कोरोना मृत्यूंची संख्या विक्रमी पातळीवर पोचली आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19)  रुग्णसंख्येतील (Patients) वाढ सुरूच असली तरी या वाढीचा वेग आता कमी होऊ लागला आहे. नवीन रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. परंतु, कोरोनामुळे होणारे मृत्यू (Covid Deaths) विक्रमी पातळीवर पोचले आहेत. जगात सर्वाधिक कोरोना मृत्यू भारतात होऊ लागले आहेत. भारतात (India) दर मिनिटाला तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. 

देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2 लाख 67 हजार 334 नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 529 जणांचा मृत्यू झाला आहे.  देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 54 लाख 96 हजार 330 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 83 हजार 248 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून 21 एप्रिलनंतर प्रथमच 17 मेपासून रोजची रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. तरीही मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा : जुळ्या भावांचा कोरोनामुळे काही तासांच्या अंतराने मृत्यू  

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असून, आता ती 32 लाखांवर आली आहे. सक्रिय रुग्णांची जास्त असल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 32 लाख 26 हजार 719 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 12.66 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 86.23 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 19 लाख 86 हजार 363 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.11 टक्के आहे. 

देशातील 24 तासांतील कोरोना मृत्यू (4 हजार 529) 
महाराष्ट्र : 1,291 
कर्नाटक : 525 
तमिळनाडू : 364 
दिल्ली : 265 
उत्तर प्रदेश : 255 
पंजाब : 231 
छत्तीसगड : 153 
राजस्थान : 146 
पश्चिम बंगाल : 145 
हरियाना : 124 
बिहार : 111  

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख