धोका वाढला : सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 25 लाखांवर; रुग्णालये पडू लागली अपुरी - india records biggest single day spike in covid cases in world | Politics Marathi News - Sarkarnama

धोका वाढला : सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 25 लाखांवर; रुग्णालये पडू लागली अपुरी

वृत्तसंस्था
शनिवार, 24 एप्रिल 2021

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 3 लाख 46 हजार नवीन रुग्ण सापडले आहेत. 

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 3 लाख 46 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 2 हजार 624 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील कोणत्याही देशात आतापर्यंत एका दिवसांत नोंदवण्यात आले नाहीत तेवढे रुग्ण भारताने सलग तिसऱ्या दिवशी नोंदवले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढू लागल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. 

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 66 लाख 10 हजार 481 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 89 हजार 544 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 46 हजार 786 रुग्ण सापडले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 25 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या सलग 45 व्या दिवशी वाढली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 25 लाख 52 हजार 940 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 15.37 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 83.49 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 38 लाख 67 हजार 997 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.14 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख