भारताने अमेरिकेलाही टाकले मागे; कोरोना लसीकरणात मारली बाजी - india overtakes us in covid vaccine first dose for people | Politics Marathi News - Sarkarnama

भारताने अमेरिकेलाही टाकले मागे; कोरोना लसीकरणात मारली बाजी

वृत्तसंस्था
शनिवार, 5 जून 2021

देशात कोरोना लशीचा पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या अमेरिकेपेक्षा अधिक आहे.

नवी दिल्ली : भारताने (India) आता कोरोना लसीकरणात (Covid Vaccination) अमेरिकेलाही (USA) मागे टाकले आहे. देशात कोरोना लशीचा पहिला डोस (First Dose) घेणाऱ्या नागरिकांची संख्या अमेरिकेपेक्षा अधिक आहे, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ.व्ही.के.पॉल यांनी दिली. 

डॉ.पॉल म्हणाले की, भारतात कोरोना लशीचा किमान एक डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या 17.2 कोटी आहे. अमेरिकेत कोरोना लशीचा पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांपेक्षा ही संख्या अधिक आहे. आपल्याला सगळ्यांचे लसीकरण होण्यासाठी काही कालावधी लागेल. कोरोनाची लाट ओसरू लागल्यानंतर आपण सगळेच बिनधास्त होतो. हे आपण जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात पाहिले होते. कोरोना विषाणू पुन्हा येणार हे निश्चित आहे. तोपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करायचे आहे. 

देशातील सक्रिय रुग्णसंख्या कमी होऊ लागली असून, याविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल म्हणाले की, सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट नोंदवण्यात येत आहे. शंभरपेक्षा अधिक रोजची रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांची संख्याही कमी होत आहे. आता 257 जिल्ह्यांमध्ये रोजचे शंभरपेक्षा अधिक नवीन रुग्ण सापडत आहेत. याचबरोबर 377 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. 

हेही वाचा : पंजाबमधील कॅप्टन अमरिंदरसिंग सरकार पडले तोंडघशी 

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु, आता लस नसल्याने अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख