भारताने ब्रिटनचे पाहून कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवलं पण कमी नाही केलं! - india increase gap between two covishield doeses after UK | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

भारताने ब्रिटनचे पाहून कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवलं पण कमी नाही केलं!

वृत्तसंस्था
बुधवार, 16 जून 2021

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. 

नवी दिल्ली :  देशात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर (Covid vaccination) भर दिला आहे. परंतु, देशात सध्या लस टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड (Covishield) लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवले आहे. ब्रिटनने आधी कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवले होते. परंतु, नंतर ते अंतर कमीही केले होते. भारताने (India) ब्रिटनचे (UK) अनुकरण करुन अंतर वाढवले पण नंतर कमी केले नाही, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. 

ब्रिटनने कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर 12 आठवड्यांपर्यंत वाढवले होते. यानंतर भारतानेही त्याचे अनुकरण केले. भारतात सापडलेल्या बी.1.617 या कोरोना विषाणूच्या प्रकाराचा प्रादुर्भाव ब्रिटनमध्ये वाढू लागल्यानंतर त्यांनी दोन डोसमधील अंतर पुन्हा 8 आठवड्यांवर आणले. दोन डोसमधील कालावधीत तुम्हाला संसर्ग होऊ नये यासाठी 6 ते 8 आठवडे कालावधी योग्य आहे. आता भारतानेही लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : भारत बायोटेक म्हणतेय, दीडशे रुपयांत कोरोना लस देणे परवडणारे नाही

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख