कोरोनाची लस घेतल्यास मिळेल सोन्याची नथनी, भेटवस्तू, डिस्काउंट कूपन अन् बरंच काही...

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी भारतासह अनेक देशांनी आता पावले उचलली आहेत.
india and other countries offer special gifts for covid 19  vaccination
india and other countries offer special gifts for covid 19 vaccination

नवी दिल्ली : जगात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. यामुळे अनेक देशांनी लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पावले उचलली आहेत. अनेक देश नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी यासाठी त्यांना प्रलोभने दाखवत आहेत. भारतातही अनेक शहरांमध्ये लस घेणाऱ्या नागरिकांना भेटवस्तू देण्यात येत आहेत. 

राजकोटमधील सराफांनी लस घेणाऱ्या नागरिकांना भेटवस्तू देण्यास सुरवात केली आहे. लस घेणाऱ्या महिलांना सोन्याची नथनी दिली जात आहे. याचवेळी पुरुषांना हँड ब्लेंडर भेट म्हणून दिला जात आहे. याचबरोबर भारतातील अनेक शहरांत अनेक विक्रेते लस घेणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन म्हणून भेटवस्तू देत आहे. काही शहरांत लस घेणाऱ्या नागरिकांना मोफत खाद्यपदार्थ दिले जात आहेत. अनेक ठिकाणी कार दुरुस्ती, स्टेशनरी, बिर्याणी, चिकन डिशेस यावर सवलत दिली जात आहे. उत्तर दिल्ली महापालिकेने लस घेणाऱ्या नागरिकांना 5 टक्के कर परतावा जाहीर केला आहे. 

रशियात लस घेणाऱ्यांना मोफत आईस्क्रीम दिले जात आहे. इस्राईलमध्ये कोका-कोला, बीअर, पिझ्झा, पेस्ट्री आदी पदार्थ दिले जात आहेत. दुबईतील तीन रेस्टॉरन्ट तुम्ही लशीचा पहिला डोस घेतला असेल तर 10 टक्के आणि दोन्ही डोस घेतले असतील तर 20 टक्के सवलत देत आहेत. अमेरिकेत लस घेणाऱ्या नागरिकांना डोनट, बीअर, व्हॅक्सिन कार्डचे लॅमिनेशन, पॉपकॉर्न तसेच, रोख रक्कम आणि व्हिडीओ गेमही दिली जात आहे. एका फूड चेनने लस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना 250 डॉलरचा बोनस आणि दोन दिवसांची सुटी देऊ केली आहे. 

मेक्सिकोत तर लस घेतलेल्या नागरिकांसाठी लाईव्ह बँडचे आयोजन करण्यात येत आहे. चीनमध्ये लस घेणाऱ्या नागरिकांना अंड्यांचे दोन बॉक्स देण्यात येत आहेत. याउलट इंडोनेशियात लस न घेणाऱ्या नागरिकांना दंड आकारला जात आहे. लसीकरणास नकार देणाऱ्या नागरिकांना दंड आणि त्यांच्या कल्याण निधीला कात्री अशा उपाययोजना इंडोनेशिया सरकारने सुरू केल्या आहेत. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com