देशभरात आतापर्यंत कोरोना लस घेतल्यानंतर झालेल्या ७९ मृत्यूंची नोंद अन् सरकार म्हणतंय... - in india 79 death reported after taking covid vaccine till march | Politics Marathi News - Sarkarnama

देशभरात आतापर्यंत कोरोना लस घेतल्यानंतर झालेल्या ७९ मृत्यूंची नोंद अन् सरकार म्हणतंय...

वृत्तसंस्था
सोमवार, 5 एप्रिल 2021

देशात 1 एप्रिलपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असून, यात 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास येत आहे. 
 

नवी दिल्ली : देशात 1 एप्रिलपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असून, यात 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास येत आहे. देशभरात आतपर्यंत कोरोना लस घेतल्यानंतर सुमारे ७९ मृत्यूंची नोंद झाली आहे. केंद्र सरकारच्या लसीकरणविषयी समितीने यातील आठ मृत्यू लशीशी निगडित असल्याचे म्हटले आहे. परंतु, याबद्दल ठोस पुरावेही नसल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. 

कोरोनाची लस घेतल्यानंतर मार्च अखेरपर्यंत ७९ मृत्यूंची नोंद देशभरात झाली आहे. केंद्र सरकारच्या लसीकरण समितीने यातील आठ मृत्यू लसीकरणाशी निगडीत असल्याचे म्हटले आहे. यातील तीन मृत्यूंमध्ये लशीचा सातत्यपूर्ण संबंध आणि पाच मृत्यूंमध्ये लशीचा असातत्यपूर्ण संबंध आहे. मात्र, याबाबत ठोस पुरावे हाती आले नसल्याचे समितीने म्हटले आहे. 

कोरोना लसीकरणाशी निगडित आठ मृत्यूंमध्ये प्रत्येकी दोन महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगण आणि मध्य प्रदेश राज्यांतील प्रत्येकी एक मृत्यू आहे. मृत्यू झालेल्या व्यक्ती या ३६ ते ६१ वयोगटातील आहेत. यातील पाच पुरुष आणि तीन महिला आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

१ एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जात आहे. यासाठी सरकारने नोंदणीचे दोन पर्याय ठेवले आहेत. यासाठी सरकारी को-विन अॅपवर ऑनलाइन नोंदणी करण्याचा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय हा प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याचा असेल. मात्र, प्रत्यक्ष नोंदणीसाठी नागरिकांना दुपारी 3 वाजल्यानंतर लसीकरण केंद्रावर जावे लागेल.

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. १ एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. यातील कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सरकारने वाढवून 6 ते 8 आठवडे केले आहे. याआधी या दोन्ही लशींसाठी दोन डोसमधील अंतर 4 आठवडे होते. त्यामुळे आधी पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी नोंदणी आपोआप होत होती. आता दोन्ही लशींच्या दोन डोसमधील अंतर वेगवेगळे असल्याने आपोआप नोंदणी बंद करण्यात आली आहे. नागरिकांना पहिला डोस घेतल्यानंतर त्यांना पुन्हा दुसऱ्या डोससाठी नोंदणी करावी लागेल. 

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख