पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात, मोदींनी निवडणूक जिंकण्यासाठीच बालाकोटमध्ये हल्ला केला!

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बीएआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅट उघड झाले आहे.
imran khan targets narendra modi over arnab goswami whats app chat
imran khan targets narendra modi over arnab goswami whats app chat

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त व्हॉट्सअॅप चॅट उघड झाले आहे. बालाकोटमधील हल्ल्यासह अतिशय महत्वाची माहिती गोस्वामींना आधीपासूनच असल्याचे यातून समोर आले आहे. आता या प्रकरणावरुन  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. 

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट रिसर्च ऑडियन्स कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

गोस्वामी यांच्या व्हॉट्सअॅप चॅटवरुन मोठा गदारोळ सुरू झाला आहे. या प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, बालाकोटच्या हल्ल्याचा वापर मोदी सरकारने निवडणूक फायदा मिळवण्यासाठी केला. केवळ सत्ता मिळवण्याच्या अट्टाहासापोटी मोदी सरकारने अण्वस्त्रसज्ज विभागाला कधीही न परवडणाऱ्या संघर्षाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले.

भारतातील फॅसिस्ट प्रवृत्तीच्या मोदी सरकारने बालाकोट हल्ल्याचा वापर निवडणूक फायदा मिळवण्यासाछी केल्याचे मी संयुक्त राष्ट्रसंघात 2019 मध्ये सांगितले होते. आता एका भारतीय पत्रकाराचे संभाषण उघड झाले असून, त्यातून माझ्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब झालेआहे. मोदी सरकार आणि भारतीय माध्यमे यांच्यातील अपवित्र संबंधही या निमित्ताने समोर आले आहेत, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे. 

गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅट मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचा वापर व्यवसायाच्या वाढीसाठी केल्याचे समोर आले आहेत. गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि माहिती व प्रसारण मंत्रालयातील स्वत:च्या वजनाचा अभिमानाने उल्लेख केला आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com