बिहारमध्ये आता 'जंगल राज' विरुद्ध 'राक्षस राज'! - If you call that jungle raj this is rakshas raj says RJD leader Tejashwi Yadav | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारमध्ये आता 'जंगल राज' विरुद्ध 'राक्षस राज'!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, राज्यातील वातावरण तापले आहे. सत्तारुढ पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये आता आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी सुरू झाल्या आहेत. 

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या कहर वाढत असताना बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बिहारमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीची घोषणा होताच आरोप-प्रत्यारोपांनीही जोर चढला आहे. राष्ट्रीज जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी आता एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. यामुळे बिहारमध्ये 'जंगल राज' विरुद्ध 'राक्षस राज' हा वाद पेटला आहे. 

कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे बिहारमधील विधानसभा निवडणूक राजकीय पक्षांच्या व्हर्च्युअल प्रचारामुळे गाजणार आहे. बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या घोषणेसोबतच बिहारमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. एकूण तीन टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  

यंदाच्या निवडणुकीत बिहारमध्ये वेगळे राजकीय चित्र पाहायला मिळणार आहे. मागील निवडणुकीवेळी सहकारी असलेले पक्ष आता विरोधात मैदानात आहेत. मागील वेळी लालूप्रसाद यादव यांचा आरजेडी, मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र होते. त्यावेळी भाजपने लोकजनशक्ती पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्षासोबत आघाडी केली होती. मागील निवडणुकीच नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा विजय झाला होता. या विजयानंतर काही महिन्यांमध्येच नितीश यांनी लालूंच्या पक्षाची साथ सोडत भाजपसोबत आघाडी केली होती. यामुळे विरोधी बाकांवरील भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष सत्तेत आला होता. 

या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. आधी या महाआघाडीचे घटक असलेले जितनराम मांझी आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) गेले आहेत. याचवेळी एनडीएमधील लोक जनशक्ती पक्षाने वाढीव जागा मिळाव्यात म्हणून आग्रह धरला आहे. 

लालूंच्या काळात राज्यात 'जंगल राज' होते, अशी टीका भाजप आणि जेडीयू करीत आहेत. या 'जंगल राज'बद्दल आरजेडीचे नेते व लालू प्रसाद यादवांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या मुद्द्यावरुन तेजस्वी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, तुम्ही राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी पाहा. तुम्ही त्यावेळच्या सरकारला जर 'जंगल राज' म्हणत असाल तर आताचे 'राक्षस राज' म्हणावे लागेल. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख