...तर महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येईल; तज्ञांनी दिला इशारा - if covid vaccination is slow then mahrashtra will face third wave of covid | Politics Marathi News - Sarkarnama

...तर महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येईल; तज्ञांनी दिला इशारा

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 एप्रिल 2021

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा कहर वाढला असून, 24 तासांत 1 हजारहून अधिक मृत्यू झाले आहेत. 

मुंबई : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा कहर वाढला असून, 24 तासांत 1 हजारहून अधिक मृत्यू झाले आहेत. राज्यात कोरोना लशीची टंचाई असून, अनेक लसीकरण केंद्रे बंद आहेत. कोरोना लसीकरणाचा वेग संथ राहिल्यास राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येईल, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. 

महाराष्ट्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली आहे. परंतु, पुरेशी लस उपलब्ध नसल्यामुळे या लसीकरण मोहिमेचा मुहूर्त 1 मे रोजी असणार नाही. तो मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात अथवा महिन्याच्या अखेरीस असेल, असे सरकारचे म्हणणे आहे. यासाठी सरकार अनेक लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा करीत आहे. 

राज्याच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाला रोखण्यासाठी किमान दोन तृतीयांश जनतेचे कोरोना लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात लस मिळायला हवी असे 9 कोटी नागरिक आहेत. यातील केवळ दीड कोटी नागरिकांनाच लस मिळाली आहे. हे प्रमाण अतिशय कमी आहे. 

आपण लसीकरणाचा वेग वाढवला नाही आणि लोक नंतर नोकरी व कामधंद्यासाठी बाहेर पडल्यानंतर कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात निर्बंध हटवण्यात आल्यानंतर लोक बेफिकीर झाले होते. यामुळे यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. आता लोकसंख्येतील मोठ्या हिश्शाचे लसीकरण न केल्यास आपण तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहोत, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

देशात 24 तासांत 3 लाख 79 हजार रुग्ण 
देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 83 लाख 76 हजार 524 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 4 हजार 832 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 79 हजार 257 रुग्ण सापडले असून, 3 हजार 645 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख