दिल्लीत आल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच मुखर्जींचे मार्गदर्शन : पंतप्रधान मोदी

वृत्तसंस्था
Monday, 31 August 2020

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जाण्याने भारतीय राजकारणातील एका पर्वाचा अस्त झाला आहे. त्यांना विविध क्षेत्रांतून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. 

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले. मुखर्जी हे 84 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक क्षेत्रांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुखर्जी यांच्या आठवणी जागवल्या आहेत. दिल्लीत आल्यानंतर पहिल्या दिवसापासून त्यांचे मार्गदर्शन लाभले, असे मोदींनी म्हटले आहे. 

प्रणव मुखर्जी यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र अभिषेक मुखर्जी यांनी ट्विटवर दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझे वडील प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले आहे. आर आर रुग्णालयातील डॉक्टरांनी माझ्या वडिलांनी वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना केली होती. याबद्दल मी सर्वांचे मी आभार मानतो.   

मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान  झाले होते. याची माहिती त्यांनीच ट्विटरवर दिली होती. त्यांनी म्हटले होते की, मी रुग्णालयात तपासणीसाठी गेलो होतो. त्यावेळी माझी कोरोना चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मागील आठवड्यात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विनंती आहे की त्यांनी स्वत: विलगीकरणात राहावे.

मुखर्जी यांच्या मेंदूत गाठ आढळून आली होती. त्यामुळे त्यांच्या मेंदूवर 10 ऑगस्टला तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीत अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नव्हती. त्यांची प्रकृती उलट ढासळली होती. ते व्हेंटिलेटरवर होते. 

पंतप्रधान मोदींना मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या जाण्याने संपूर्ण भारताला दु:ख झाले आहे. अतिशय विद्वान असलेले मुखर्जी यांना सर्व क्षेत्रातून मान्यता होती. मी दिल्लीत 2014 मध्ये आलो. तेव्हा पहिल्या दिवसापासून मला त्यांचे मार्गदर्शन, पाठिंबा आणि आर्शीवाद लाभले. त्यांच्यासोबतच्या स्मृती माझ्या कायम स्मरणात राहतील. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.  

Edited by Sanjay jadhav