लालूंचे पुत्र म्हणतात, एक्झिट पोलवर विश्वास नाही! - I do not believe in exit polls as I believe in people says Tej Pratap Yadav | Politics Marathi News - Sarkarnama

लालूंचे पुत्र म्हणतात, एक्झिट पोलवर विश्वास नाही!

वृत्तसंस्था
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. या निवडणुकीत तेजस्वी यादव हे सत्तास्थापना करतील, असे अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात येत आहेत. 

पाटणा : बिहारमध्ये सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) - भाजपची राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) - काँग्रेसच्या महाआघाडीत सत्तेसाठी रस्सीखेच राहणार आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे पारडे जड दिसत आहे. तेजस्वी यादव यांचे मोठे बंधू तेजप्रताप यादव यांनी एक्झिट पोलवर विश्वास नसल्याचे म्हटले आहे.  

एक्झिट पोल जरी आमच्या विजयाचे भाकित वर्तवत असले तरी त्यावर माझा विश्वास नाही, असे तेजप्रताप यादव यांनी सांगितले. ते म्हणाले की, मी जनतेशी संवाद साधला असून, त्यांनी आरजेडीच्या नेतृत्वाखालील महाआघाडीवर विश्वास टाकला आहे. त्यामुळे आमच्या विजयाबद्दल मला आत्मविश्वास आहे. जनतेने नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला नाकारले आहे. त्यामुळे मी एक्झिट पोलऐवजी जनतेवर विश्वास ठेवतो. 

निवडणुकीत अनेक घटक महत्वाचे ठरतात. नितीशकुमारांनी बिहारमध्ये अंधकार करुन ठेवला आहे. बेरोजगारीमुळे जनतेला स्थलांतर करावे लागत आहे. नितीशकुमारांच्या सरकारने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून, शेतकऱ्यांना मूर्ख बनवले आहे, असे तेजप्रताप यादव यांनी म्हटले आहे. 

टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार, आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीला मोठे यश मिळेल. महाआघाडीतील आरजेडी 180, काँग्रेस 11 जागा आणि एनडीएतील भाजप 55 आणि जेडीयू 11 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इतर पक्षांना 8 आणि अपक्षांना 4 जागा मिळतील, असेही म्हटले आहे. 

ईटीजीच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला 114, महाआघाडीला 120, लोक जनशक्ती पक्षाला 3 आणि इतरांना 6 जागा मिळतील. टीव्ही 9 भारतवर्षच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 115, महाआघाडीला 120, लोक जनशक्ती पक्ष 4 आणि इतरांना 4 जागा मिळतील. 

इंडिया टु़डे - माय अॅक्सिस एक्झिट पोलनुसार मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत तेजस्वी यादव हे आघाडीवर आहेत. तेजस्वी यादव यांना 44 टक्के, नितीशकुमार यांना 35 टक्के आणि चिराग पासवान यांना 7 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. जनतेकडून मुख्यमंत्रिपदासाठी तेजस्वी यादव यांनाच पसंती असल्याचे म्हटले आहे. 

टाईम्स नाऊ - सी व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 116 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याचवेळी महाआघाडीला 120 जागा मिळतील, असे म्हटले आहे. लोक जनशक्ती पक्षाला केवळ एक जागा मिळेल असे म्हटले असून, इतरांना सहा जागा मिळतील. 

रिपब्लिक टीव्ही जन की बातच्या एक्झिट पोलनुसार आरजेडीला बिहारमध्ये सर्वाधिक जागा मिळतील. एनडीएला 91 ते 117, महाआघाडीला 118-138, लोक जनशक्ती पक्ष 5 ते 8 आणि इतरांना 3 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बिहारच्या विधानसभेचे संख्याबळ 243 असून, बहुमतासाठी 122 जागा आवश्यक आहेत. 

Edited by Sanjay Jadhav 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख