सुशांतप्रकरणी चर्चेत आलेले गौरव आर्या नेमके आहेत तरी कोण? - hotelier gaurav arya will be questioned by ed in sushant singh rajput case | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांतप्रकरणी चर्चेत आलेले गौरव आर्या नेमके आहेत तरी कोण?

वृत्तसंस्था
रविवार, 30 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचा तपासावरुन उठलेला गदारोळ कायम आहे. या प्रकरणी गोव्यातील उद्योगपती गौरव आर्या यांचे नाव चर्चेत आले आहे. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी गोव्यातील उद्योगपती गौरव आर्या यांचे नाव आता चर्चेत आले आहे. त्यांना सक्त वसुली संचालनालयाने चौकशीसाठी 31 ऑगस्टला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या मुंबईत होणाऱ्या चौकशीला हजर राहण्यासाठी आर्या हे गोव्याहून मुंबईला रवाना झाले आहेत. गोव्यातील अनेक प्रसिद्ध हॉटेलांचे मालक असलेले आर्या हे केवळ दशकभरापूर्वी गोव्यात दाखल झाले होते. अतिशय कमी काळात त्यांनी राज्यात मोठा व्यवसाय उभारला आहे. 

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुरू केला आहे. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची सीबीआयकडून आज सलग तिसऱ्या दिवशी चौकशी करण्यात येत आहे. याचबरोबर तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती याची आज सलग चौथ्या दिवशी चौकशी होत आहे. हे दोघेही आज सकाळी सीबीआयचे पथक थांबलेल्या डीआरडीओ गेस्ट हाऊसवर पोचले. सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युएल मिरांडा आणि घरी काम करणारा केशव हेही सकाळीच चौकशीसाठी हजर झाले आहेत. 

सीबीआयने रियाची शुक्रवारी 10 तास चौकशी केली होती. त्यानंतर शनिवारी तिची सात तास चौकशी करण्यात आली होती. तिचा भाऊ शोविक याची सीबीआय गुरुवारपासून चौकशी करीत आहे. तसेच, सीबीआयने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, स्वयंपाकी नीरजसिंह आणि अकाउंटंट रजत मेवाती यांची चौकशी शनिवारी केली होती. 

आता या प्रकरणात गोवास्थित उद्योगपती गौरव आर्या यांचे नाव चर्चेत आले आहे. काही वृत्तवाहिन्यांनी रियाचे व्हॉट्सअॅप चॅट त्यांच्या हाती लागल्याचा दावा केला आहे. या चॅटमध्ये अमली पदार्थांच्या रॅकेटची नावे आहेत. यात गौरव आर्या यांचाही उल्लेख आहे. त्यामुळे ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. ते या चौकशीसाठी गोव्याहून मुंबईला रवाना झाले आहेत. 

गोव्यातील अनेक प्रसिद्ध रिसॉर्ट्स आणि कॅफे हे आर्या यांच्या मालकीचे आहेत. त्यांचे कॅफे कोटिगा आणि इतर काही रिसॉर्ट ही पार्टीसाठी लोकप्रिय आहेत. सुमारे दशकभरापूर्वी गोव्यात गेलेल्या आर्या यांनी तेथे आता त्यांचा मोठा व्यवसाय उभारला आहे. गोव्यातील रिअल इस्टेटमध्येही त्यांची मोठी गुंतवणूक केली आहे. आर्या यांचा जन्म दिल्लीत झाला. दिल्लीतील ग्रे वर्ल्डवाईड या अॅडव्हर्टाईज एजन्सीतून त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांचे पिता राम आर्या यांचाही हॉटेल व्यवसाय आहे. सुशांतला भेटण्याआधी रिया आणि गौरव आर्या यांचे अतिशय जवळचे संबंध होते. बॉलीवूडमधील अनेक जणांशीही त्यांचे निकटचे संबंध आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख