तुम्ही कितीही प्रयत्न करा पण चित्रपट उद्योग कुठेही जाणार नाही; गृहमंत्री देशमुखांनी योगींना ठणकावले - home minister anil deshmukh slams uttar pradesh chief minister yogi adtiyanath | Politics Marathi News - Sarkarnama

तुम्ही कितीही प्रयत्न करा पण चित्रपट उद्योग कुठेही जाणार नाही; गृहमंत्री देशमुखांनी योगींना ठणकावले

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 2 डिसेंबर 2020

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरुन मोठा गदारोळ सुरू झाला आहे. 

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशात योगी सरकारला स्वत:ची फिल्मसिटी विकसित करायची आहे. त्या दृष्टीने योगींनी बॉलीवूडमधील काही निर्माते, अभिनेते आणि उद्योगपतींशी चर्चा केली. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी योगींना ठणकावले आहे.  

मुंबईत योगी आदित्यनाथ ट्रायडंट हॉंटेलमध्ये वास्तव्यास आहेत. योगींच्या मुंबई भेटीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे), शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त करीत टीकाही केली आहे. 

गृहमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे की, शंभर वर्षांपूर्वी येथे चित्रपटसृष्टी स्थापन झाली. मुंबईत असलेल्या सुविधांप्रमाणे इतर कोणतेही राज्य सुविधा पुरवू शकेल, असे मला वाटत नाही. आमच्याकडील कायदा व सुव्यवस्था अतिशय चांगली आहे. मला आत्मविश्वास आहे की, चित्रपट उद्योग कुठेही जाणार नाही. योगींनी कितीही प्रयत्न केले तरी हे घडणार नाही.  

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, योगी आदित्यनाथ हे साधू आहेत सप्ततारांकीत हॉटेलमध्ये ते थांबले आहेत. नोएडामधील चित्रपटसृष्टीची अवस्था काय आहे ते सुद्धा त्यांनी सांगावे. योगी तामिळनाडूत जाणार आहेत का? तिकडेही मोठी चित्रपटसृष्टी आहे. त्यांचा पंगा फक्त मुंबईशी आहे का? आमच्या शुभेच्छा..तुम्ही भिंती उभी कराल पण चित्रपटसृष्टी निर्माण करणार का? 

मनसेही योगींना लक्ष्य केले आहे. उत्तर प्रदेशात निर्माण होणाऱ्या फिल्मसिटीत योगी आदित्यनाथ यांना मुंबईचं वैभव असलेल्या बॉंलिवूडला न्यायचंय. त्यांच्या याच कृतीला मनसेने आता होर्डिंगच्या माध्यामातून उत्तर दिलंय. याच हॉटेलच्या खाली मनसेचे घाटकोपर येथील विभागअध्यक्ष गणेश चुक्कल यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांना यूपीचा "ठग" म्हटलंय. मुंबई लुटायला आलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा इरादा हा मुंगेरीलालचे स्वप्नं असल्याचंही त्यांनी होर्डिंगमध्ये म्हटलंय. हेच होर्डिंग भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाबाहेरही लावण्यात आलंय. 
कहा राजा भोज...और कहा गंगू तेली... 
कुठे महाराष्ट्राचं वैभव...तर कुठे युपीचं दारिद्र... 

भारतरत्नं दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपट सृष्टी, युपी ला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्नं आहे. अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला आहे असेही मनसेने म्हटले आहे. 

Edited Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख