दोन बड्या मंत्र्यांवर हितेंद्र ठाकूर पडले भारी; ठाणे जिल्हा बँकेवर पालघरचेच वर्चस्व

पालघर आणि ठाणे जिल्ह्याची बँक ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन मंत्र्यानी ताकद लावूनही हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे.
hitendra thakur sahkar panel wins thane district co operative bank
hitendra thakur sahkar panel wins thane district co operative bank

विरार : पालघर आणि ठाणे जिल्ह्याची बँक ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन मंत्र्यानी ताकद लावूनही हितेंद्र ठाकूर आणि किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. ही वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीची सलामी मानली जात आहे.            
हितेंद्र ठाकूर यांच्यावर राजकीय मात करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु, हितेंद्र ठाकूर यांच्या सहकार पॅनलने 21 पैकी 18 जागा एकतर्फी जिंकत शिंदे आणि आव्हाड यांना धक्का दिला आहे. वसई आणि पालघर जिल्ह्यात वर्चस्व मिळवण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न जितेंद्र आव्हाडांना सोबत घेऊनही असफल ठरला. वसई विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली बँकेची निवडणूक अनेक महत्वाची मानली जात होती.

लोकसभेच्या २०१८  झालेल्या पोटनिवडणुकीपासून शिंदे यांनी वसईसह पालघरमधील ठाकूरांचे वर्चस्व मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरु केले. हे प्रयत्न बँकेच्या निवडणुकीतही कायम होते. परंतु, यावेळीही ठाकूरांनी त्यांच्यावर मात केली. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ताब्यात ठेवण्यासाठी या वेळी ठाकूरांविरोधात शिंदे आणि आव्हाडांनी कंबर कसली होती. शिंदे-आव्हाडांचे आव्हान स्वीकारत ठाकूरही मागे हटले नव्हते. त्यांनी थेट भाजपशीच हातमिळवणी करण्याची खेळी खेळली. किसन कथोरे, संजय केळकर यांना सोबत घेऊन  त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, माकपमधील इच्छुक उमेदवारांना उमेदवारी देत सहकार पॅनल त्यांनी मैदानात उतरवले. 

शिंदे-आव्हाडांनी महाविकास आघाडीचे पॅनल मैदानात उतरवले होते. ठाणे जिल्हा बँकेवर आमदार ठाकूर यांचे समर्थक राजेंद्र पाटील हे मागील पाच वर्षे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते.  त्यामुळे ठाकूरांना निवडणुकीतील बारकावे माहिती असल्याने ठाकूरांना बरोबर घेऊन निवडणूक लढवू, असा आग्रह महाविकास आघाडीशी संबंधित बँकेच्या मावळत्या संचालकांनी धरला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यासाठी प्रयत्न करून पाहिला होता. राष्ट्रवादीचे पालघर जिल्हाध्यक्ष व आमदार सुनील भुसारा यांनीही हीच भूमिका घेतली होती. शिंदे आणि आव्हाडांनी मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले. ठाकूरांच्या सोबत जाण्याचा आग्रह धरणाऱ्या भुसारांसह बँकेच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावू शकतील अशांना बाजूला सारण्यात आले. त्याचा परिणाम निकालात दिसून आला आहे. 

सहकार पॅनलने 21 पैकी तब्बल 18 जागा जिंकत शिंदे-आव्हाडांना धक्का दिला आहे. हितेंद्र  ठाकूरांनी गेली तीस वर्षांहून अधिक काळ ठाकूरांनी वसईवर वर्चस्व कायम ठेवले आहे. बँकेच्या सव्वातीन हजार सभासदांपैकी तब्बल साडेनऊशे सभासद वसई तालुक्यातील आहेत. हे आकडे पाहून शिंदे-आव्हाडांनी निवडणुकीची रणनिती आखण्याची गरज होती. याचवेळी बँकेच्या निवडणुकीसाठी कोणते गट असतात याची माहितीही शिवसैनिकांना नसल्याचे निकालानंतर समजले. केवळ हितेंद्र ठाकूर नकोत या एका ध्येयाने पछाडलेल्या शिंदेंच्या ही बाब लक्षात आली नाही.

जिल्हा बँकेनंतर आता मागील आठ महिन्यांपासून रखडलेली वसई विरार महापालिकेची निवडणुका होणार आहे. त्यामुळे बँकेची निवडणूक अनेक दृष्टीने महत्वाची ठरणार आहे. महापालिका ताब्यात घेण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या वर्षी आयुक्तपदी गंगाथरन डी. यांची वर्णी लावून मोर्चेबांधणी केली आहे. वसईत संघटना म्हणून शिवसेनेची ताकदही त्यांना पाहावी लागणार आहे.

शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता कमी असून, निवडणुका जिंकून देईल असा एकही नेता सध्या तरी दिसत नाही. शिवसेनेकडे असे किती उमेदवार आहेत जे सहजपणे निवडून येऊ शकतात, याचाही विचार करावा लागणार आहे. त्यासाठी शिंदेंना वसईत येऊन वेळ देण्याची गरज भासणार आहे. तसेच संघटना वाढवण्याचे काम करणाऱ्यांनाच नेतृत्व करण्याची संधी द्यावी लागणार आहे. संघटना वाढीसाठी इतर पक्षांप्रमाणे या ठिकाणी नवा जिल्हाप्रमुख नेमून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com