भाजप बदलणार आणखी एक मुख्यमंत्री? तातडीनं दिल्लीला बोलावलं

भाजपच्या आणखी एका राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
himachal pradesh cm jai ram thakur summoned by bjp leadership
himachal pradesh cm jai ram thakur summoned by bjp leadership

शिमला : भाजपच्या (BJP) आणखी एका राज्यात मुख्यमंत्री (Chief Minister) बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकताच भाजपने गुजरातमध्ये (Gujarat) मुख्यमंत्री बदलला होता. आता हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) बदल होणार असून, मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jai Ram Thakur) यांना तातडीने दिल्लीला पाचारण करण्यात आले आहे. याचबरोबर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले आहे. 

हिमाचल प्रदेशात आता मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागले आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री हे 12 सप्टेंबरलाच दिल्लीहून परतले होते. त्यानंतर त्यांना आता पुन्हा दिल्लीला पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्लीला बोलावण्यात आला आहे. दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक होणार असून, या बैठकीला प्रभारी अविनाश राय खन्ना, संजय टंडन, संघटन सचिव पवन राणा, प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप हे उपस्थित असणार आहेत. 

याआधी 7 सप्टेंबरला मुख्यमंत्री ठाकूर हे दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते उज्जैन येथे महाकालाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून  ते 12 सप्टेंबरला राज्यात परतले होते. 

गुजरातमध्ये वेळेआधीच रूपानी पायउतार 
मागील 6 महिन्यांत कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच भाजपच्या चौथ्या मुख्यमंत्र्यांची विकेट पडली आहे. उत्तराखंड, कर्नाटकनंतर आता गुजरातमध्ये वेळेआधीच मुख्यमंत्री बदलण्याची नामुष्की भाजपवर ओढवली आहे. गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ राज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पायउतार होणे अनपेक्षित होते. असे असताना विजय रूपानी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्री बनले आहेत. 

उत्तराखंडमध्ये चार महिन्यांत 3 मुख्यमंत्री 
उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्रसिंह रावत यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच मार्च महिन्यात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर मुख्यमंत्रिपदी तिरथसिंह रावत आले होते. त्यांना चार महिन्यांतच जुलैमध्ये मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते. नंतर पुष्करसिंह धामी यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्रिपदासाठी झाली. उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. तोपर्यंत मुख्यमंत्री कोण नेमावा, असा तिढा नेतृत्वासमोर होता. 

कर्नाटकात येडियुरप्पांचा राजीनामा   
येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम जुलैमध्ये आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com