राजकारण्यांना कोरोना औषधांचा साठा करण्याचा अधिकार नाही; उच्च न्यायालयाने फटकारले - high court says politicians have no business to hoard medicine stocks | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

राजकारण्यांना कोरोना औषधांचा साठा करण्याचा अधिकार नाही; उच्च न्यायालयाने फटकारले

वृत्तसंस्था
सोमवार, 17 मे 2021

राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून कोरोनावरील रेमडेसिव्हिरसह इतर औषधांची साठेबाजी होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. 

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा (Covid19) कहर सुरु असून, या परिस्थितीत काही राजकीय पक्ष आणि नेते (Politicians)  हे रेमडेसिव्हिरसह (Remdesivir) इतर कोरोना औषधांची (Medicines) साठेबाजी करीत असल्याचे समोर आले आहे. उच्च न्यायालयाने (High Court) याची आज गंभीर दखल घेतली. राजकीय नेत्यांना अशा प्रकारे साठेबाजी (Hoarding) करण्याचा कोणताही अधिकार नसून, त्यांनी तातडीने त्यांच्या ताब्यातील औषधे सरकारकडे सोपवावीत, असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. 

रेमडेसिव्हिरसह अनेक औषधांचा साठा राजकीय नेते करीत असून, त्याचे वाटप ते कार्यकर्त्यांना करीत आहेत. परंतु, रुग्णांना धावाधाव करुनही ही औषधे मिळत नसल्याचे चित्र आहे. याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल आहे. यावर आज सुनावणी झाली. न्यायालय म्हणाले की, नेत्यांनी ही औषधे राजकीय फायद्यासाठी नव्हे तर सामाजिक कार्य म्हणून खरेदी केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी ही औषधे तातडीने दिल्ली सरकारच्या आरोग्य सेवा महासंचालकांकडे जमा करावीत. यातून त्यांचा वापर सरकारी रुग्णालयातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी होईल. 

हेही वाचा : बँकांवर मोठं संकट : हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू 

दिल्ली पोलिसांनी राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या औषधांच्या साठेबाजीचा तपास करुन त्याचा अहवाल आज न्यायालयासमोर सादर केला. यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत या तपास अहवालावर ताशेरे ओढले. पोलिसांनी या प्रकरणी योग्य पद्धतीने तपास करुन चांगला तपास अहवाल आठवडाभरात सादर करावा, अशी तंबीही न्यायालयाने दिली. 

देशात 24 तासांत कोरोनामुळे 4 हजार 106 मृत्यू 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2 लाख  81  हजार 386 नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 106 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 49 लाख 65 हजार 463 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 74 हजार 390 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख