शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला उच्च न्यायालयाचा दणका; तुरुंगातील मुक्काम वाढला

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रायाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती आणि वितरण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला उच्च न्यायालयाचा दणका; तुरुंगातील मुक्काम वाढला
high court denies bail to actress shilpa shetty husband raj kundra

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती आणि वितरण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. कुंद्रा याने जामिनासाठी केलेला अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. 

कुंद्राला मागील महिन्यात अटक करण्यात आली होती. त्याला सुनावण्यात आलेली पोलीस कोठडी बेकायदा असल्याचा दावा त्याने केला होता. त्याने पोलीस कोठडीला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याला ताब्यात घेण्याआधी पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती, असा दावा केला. या प्रकरणी त्याने उच्च न्यायालयात जामीन अर्जही केला होता. उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेल्या पोलीस कोठडीच्या आदेशात काहीही चुकीचे नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. कुंद्रा हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. 

मुंबई पोलिसांनंतर आता कुंद्रा सक्त वसुली संचालनालयाच्या (ED) फेऱ्यात अडकला आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन ईडी तपास सुरू करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परकी चलन विनिमय कायद्यानुसार कुंद्राच्या विरोधात ईडी गुन्हा दाखल करणार आहे. याचबरोबर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यानुसारही त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई 26 जुलैनंतर होणार आहे. आर्थिक गुन्ह्यांशी निगडित प्रकरणांचा तपास ईडी करते. त्यामुळे ईडीकडून लवकरच या प्रकरणी कार्यवाही केली जाणार आहे.

परकी चलन विनिमय आणि आर्थिक आर्थिक अनियमितता याच्याशी संबंधित हे प्रकरण असल्यामुळे मुंबई पोलिसांनी ईडीला कळवले होते. ईडी तपास सुरू करण्याआधी मुंबई पोलिसांकडून या प्रकरणातील एफआयआर घेणार आहे. यामुळे ईडी लवकरच कुंद्राला चौकशीसाठी मुंबईतील कार्यालयात बोलावण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

कुंद्रा (वय 45) याला पॉर्न फिल्म रॅकेटप्रकरणी 19 जुलैला अटक झाली आहे. या प्रकरणात एकूण 12 आरोपी आहेत. अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन त्यांचे वितरण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कुंद्रा याला सुरवातीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. नंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कुंद्रा असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी कुंद्राकडून 48 टीबी डेटा जप्त केला असून, यात अश्लील फोटो, व्हिडीओंचा समावेश आहे. 

या प्रकरणात कुंद्रा हा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्या बँक खात्यात दर दिवशी लाखो रुपये जमा होत होते. हॉटशॉट ॲप्सद्वारे हा प्रकार चालविला जात होता, असा आरोप पोलिसांनी केला आहे. राज कुंद्रा याच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने पोलिसांनी पावले टाकली आहेत. पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणा-या रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने राज कुंद्रा याला अटक केली होती. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in