हरियानाचे मुख्यमंत्री खट्टर यांनी सुशांतच्या वडिलांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरुन उठलेला गदारोळ कायम आहे. आता या प्रकरणी सीबीआयने तक्रार दाखल केल्यानंतर ईडीनेही चौकशीस सुरूवात केली आहे.
haryana chief minster manohar lal khattar met sushant singh rajputs father
haryana chief minster manohar lal khattar met sushant singh rajputs father

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू असून, केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावरुन राजकीय गदारोळ सुरू असताना सुशांतचे वडील के.के.सिंह यांची आज हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज फरीदाबादमध्ये भेट घेतली. यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतला आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात सक्त वसुली संचालनालयानेही (ईडी) उडी घेतली. सुशांतचा मृत्यू, आर्थिक अनियमतिताप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह पाच जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांचा समावेश आहे. बिहार पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सीबीआयने जप्त केली आहेत. ईडीने या प्रकरणी रियाचे चार्टर्ड अकाउंटंट रितेश शाह आणि संदीप श्रीधर यांची चौकशीही केली होती. तसेच, सॅम्युएल मिरांडा याची आधी तब्बल नऊ तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. काल ईडीने या प्रकरणी रिया, शोविक यांच्यासोबत श्रुती या तिघांची चौकशी केली होती.  

सुशांतची बहिण ही फरीदाबाद येथे राहते. तिचे पती ओ.पी.सिंह हे आयपीएस अधिकारी असून, ते फरीदाबादचे पोलीस आयुक्त आहेत. सुशांतचे पिता फरीदाबादला गेले होते. आज हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सुशांतच्या वडिलांची भेट घेतली. या वेळी सुशांतची बहिणही उपस्थित होती. या वेळी दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली. 

राजस्थानमधील राजकीय बंडानंतर काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट हे 18 समर्थक आमदारांसह हरियानातच गेले आहेत. या मुद्द्यावरुन काँग्रेसने पायलट यांच्यासह भाजप आणि खट्टर यांना लक्ष्य केले होते. आता सुशांतच्या वडिलांची खट्टर यांनी भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. खट्टर या प्रकरणात काय भूमिका बजावणार याकडे लक्ष लागले आहे. 

सुशांत याने 14 जूनला मुंबईतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com