...तर पेट्रोल 56 अन् डिझेल 55 रुपये लिटरने मिळू शकते

देशात पेट्रोलआणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
gst will bring down petrol and diesel prices
gst will bring down petrol and diesel prices

नवी दिल्ली : देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेल वस्तू व सेवा करांतर्गत  (जीएसटी) आणण्याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. असे घडल्यास पेट्रोलचा दर 56.44 रुपये तर डिझेल 55.41 रुपयांवर येऊ शकतो. पण सरकार इंधनावरील करावर पाणी सोडणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 
 
लखनौ येथे जीएसटी परिषदेची 45 वी बैठक होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत पेट्रोल व डिझेल जीएसटीअंतर्गत आणण्यावर चर्चा होणार आहे. देशात बहुतेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे. यातच एलपीजी सिलिंडर दरवाढीची भर पडली आहे. या दरवाढीमुळे आधीच महागाईने होरपळत असलेल्या जनतेला आणखी चटके बसू लागले आहेत. त्यामुळं दरवाढ कमी करण्याची मागणी जोर धरत आहे. पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी लागू केल्यास हे दर खूप खाली येऊ शकतात. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोल व डिझेलवर जीएसटी लागू केल्यास देशभर फक्त 28 टक्के कर लागू होईल. म्हणजेच केंद्र सरकार आणि विविध राज्यांमध्ये असलेले सर्वप्रकारचे कर रद्द होऊन केवळ जीएसटी असेल. असे झाल्यास इंधनाचे दर 30 ते 40 टक्कयांनी खाली येऊ शकतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकेल. त्यामुळे जीएसटी परिषदेच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 

सध्या दिल्लीत पेट्रोलचा मूळ दर प्रतिलिटर 40.78 रुपये आहे. यात वाहतूक खर्च दर धरून वितरकाला हा दर 41.10 रुपये पडतो. यावर उत्पादन शुल्क 32.90 रुपये, वितरकाचे कमिशन 3.84 रुपये, मूल्यवर्धित कर (व्हॅट) 23.35 रुपये आकारले जाते. यानंतर ग्राहकाला दिल्लीत पेट्रोल 101.19 रुपयांना विकले जाते. आता जीएसटी लागू झाल्यास केवळ 28 टक्के कर असेल म्हणजेच तो 11.50 रुपये असेल. त्यावर वितरकाचे कमिशन 3.84 रुपये धरून ग्राहकाला पेट्रोल 56.44 रुपयांना मिळू शकते. 

हाच प्रकार डिझेलच्या बाबतीत आहे. दिल्लीत डिझेलचा मूळ दर प्रतिलिटर 41.27 रूपये आहे. ग्राहकाला डिझेलची विक्री 88.62 रूपयांना केली जात आहे. जीएसटी लागू झाल्यास हा दर 55.41 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो. परंतु, सरकार एवढा कर सोडून देणार की जीएसटीवरील सर्वाधिक कराची 28 टक्क्यांचा स्लॅब पेट्रोल आणि डिझेलसाठी वाढवणार हा प्रश्न आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com