उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींना वेग; राज्यपाल कोश्यारी शर्यतीत

उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्याविरोधात सत्ताधारी भाजपमध्ये नाराजी वाढली आहे. त्यामुळे त्यांना बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
governor bhagat singh koshyari in race for uttarakhand chief minister
governor bhagat singh koshyari in race for uttarakhand chief minister

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्याबद्दल सत्तारूढ भाजपच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आल्याने रावत यांना बदलण्याच्या हालचाली पक्षात वेगाने सुरू झाल्या आहेत. भाजप आमदारांची बैठक उद्या (ता.9) डेहराडूनमध्ये होत आहे. या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा करण्यात येईल, असे समजते. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा शर्यतीत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेही नाव आहे.  
 
उत्तराखंडचे अनेक आमदार व मंत्री दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. रावत यांना पक्षाच्या नेतृत्वाकडून राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे समजते. दोन दिवसांपूर्वी पक्ष नेतृत्वाने रमणसिंह व दुष्यंत गौतम यांना उत्तराखंडमध्ये पाठवले होते. त्यांनी भाजपच्या ४५ आमदारांशी चर्चा करून याबाबतचा अहवाल पक्ष नेतृत्वाकडे सादर केला होता. त्यानंतर रावत यांना बदलण्याच्या हालचालींना वेग आला. रावत यांच्या नेतृत्वाखाली भाजपला पुढील वर्षीची विधानसभा निवडणूक जिंकणे अशक्‍य असल्याचे आमदारांनी पक्षनेतृत्वाला थेट सांगितले आहे. 

मुख्यमंत्री रावत हे आज दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्याशी चर्चा केली. परंतु, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट त्यांना मिळू शकली नाही. शहा यांनी उत्तराखंडबाबत नड्डा व संतोष यांच्याबरोबर चर्चा केली आहे. शहा हे आज रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करतील व मध्यरात्रीनंतर नव्या नावाबाबतचा निर्णय जाहीर होऊ शकतो. 

राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कार्यकाळ संपण्याआधीच बदलायचे नाही, अशी पद्धत भाजपमध्ये सध्या रुढ आहे. मुख्यमंत्र्याबद्दल कितीही तक्रारी आल्या तरी तोच चेहरा कायम ठेवायचा, हे सूत्र मोदी आणि शहांनी महाराष्ट्रासह अन्य सर्व राज्यांत मागील सात वर्षे पाळले आहे. मात्र, उत्तराखंडमध्ये रावत यांच्या निष्क्रियतेविरूद्ध भाजपमध्येच उद्रेक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे त्यांना बदलण्याशिवाय पक्षनेतृत्वासमोर इतर कोणताही पर्याय शिल्लक नसल्याचे सूत्रांनी सांगितले.  

उत्तराखंड राज्याची स्थापना झाल्यापासून मागील दोन दशकांत नारायणदत्त तिवारी वगळता एकाही मुख्यमंत्र्याला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. यात महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचाही समावेश आहे. त्यामुळेच कोश्यारीही यावेली मुख्यमंत्रिपदासाठी उत्सुक आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या इतर नावांत अजय भट्ट, सतपाल महाराज, धनसिंह रावत, अनिल बलुनी यांचा समावेश आहे. यातील रावत, भट्ट यांची नावे आघाडीवर आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com