अकरा वर्षाच्या बहिणीला वाचवण्यासाठी तिनं आयुक्तांच्या गाडीसमोरच घेतली उडी

डेंगीचा कहर सुरू असून सुमारे 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
अकरा वर्षाच्या बहिणीला वाचवण्यासाठी तिनं आयुक्तांच्या गाडीसमोरच घेतली उडी
A girl flung herself before the vehicle of commissioner in UP

लखनऊ : उत्तर प्रदेशात डेंगीचा (Dengue in UP) कहर सुरू असून सुमारे 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. प्रामुख्याने लहान मुलांमध्ये हे प्रमाण वाढत असल्यानं पालकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. रुग्णालयांमध्ये जागा मिळत नाही, उपचार चांगले होत नाहीत, असा आरोप करत पालक नेते व प्रशासनाला धारेवर धरत आहेत. सोमवारी सायंकाळी असाच अनुभव आग्र्याच्या (Agra) विभागीय आयुक्तांना आला. (A girl flung herself before the vehicle of commissioner in UP)

निकीता कुशवाहा हिची 11 वर्षांची बहीण फिरोजाबादमधील (Firozabad) सरकारी रुग्णालयात डेंगीच्या उपचारासाठी दाखल होती. तिची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. याचवेळी आग्र्याचे विभागीय आयुक्त अमित गुप्ता पाहणीसाठी तिथे आले होते. निकीताने त्यांच्यासमोर जात थेट गाडीसमोर उडी घेतली. आपल्या बहिणीला चांगले उपचार मिळत नाहीत. तिला उपचार मिळाले नाहीत, तर तिचा मृत्यू होईल, तिला वाचवा, अशी विनवणी ती करू लागली. 

निकीताला दोन महिला पोलिसांनी गाडीसमोरून ओढून बाजूला काढलं. त्यानंतर विभागीय आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण निकीताच्या या धडपडीचा काहीच उपयोग झाला नाही. या घटनेनंतर काही तासांतच तिची बहीण वैष्णवीचा मृत्यू झाला. बहिणीला योग्य उपचार मिळाले नसल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच डॉक्टरांना निलंबित करून चौकशीची मागणीही निकीतानं केली आहे. 

दरम्यान, वैष्णवीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचा दावा रुग्णालय प्रशासनानं केला आहे. तिची प्रकृती खूपच गंभीर होती. यकृत व पोटामध्ये संसर्ग झाला होता. तिची प्रकृती खालावल्यानंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आम्ही सगळे प्रयत्न केले पण तिला वाचवू शकलो नाही, अंस फिरोजाबाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगिता अनेजा यांनी सांगितलं. 

फिरोजाबादमध्ये आतापर्यंत 60 जणांचा डेंगीमुळं मृत्यू झाला आहे. निकीताप्रमाणे अनेक कुटूंबियांची हीच अवस्था आहे. फिरोजाबादमधील बहुतेक रुग्णालयांमध्ये डेंगीचे रुग्ण भरले आहेत. रुग्णांना बेड मिळणंही कठीण जात आहे. त्यामुळं कुटूंबीय हतबल होत आहेत. वेळेत बेड मिळत नसल्यानंही काही मृत्यू झाल्याचा दावा कुटूंबियांकडून केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in