संपत्ती गमावण्याचा अदानींचा जागतिक विक्रम; एकाच आठवड्यात 13.2 अब्ज डॉलर पाण्यात

आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी यांच्यासाठी हा आठवडा धक्कादायक ठरला आहे.
gautam adani lost more money in this week than any other
gautam adani lost more money in this week than any other

मुंबई : आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले अदानी ग्रुपचे (Adani Group) प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासाठी हा आठवडा धक्कादायक ठरला आहे. त्यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या तीन कंपन्यांची खाती गोठवल्याच्या बातमीने शेअर बाजारात (Share Market) एकच खळबळ उडाली. त्यामुळे अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण होऊन या आठवड्यात अदानींना तब्बल 13.2 अब्ज डॉलर (सुमारे 97 हजार कोटी रुपये) गमावले आहे. एका आठवड्यात एवढी संपत्ती गमावण्याचा जागतिक विक्रम त्यांनी नोंदवला आहे. 

हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आणलेल्या सुचेता दलाल यांनी नुकतेच एक ट्विट केलं होतं. शेअर बाजारात आणखी घोटाळा सुरू असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. त्यांनी हे ट्विट केल्यानंतर शेअर बाजारात अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या समभागात घसरण होण्यास सुरवात झाली आहे. या आठवड्यात अदानी ग्रुपमधील सर्वांत मोठी कंपनी अदानी ग्रीन एनर्जीच्या सभाभागात 7.7 टक्के घसरण झाली आहे. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या समभागात 4 दिवसांत 23 टक्के घसरण झाली आहे. अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन यांच्या समभागांमध्ये किमान 18 टक्के घसरण नोंदवण्यात आली आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या समभागात 15 टक्के घसरण झाली आहे. 

आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीचा किताब रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्याकडे आहे. दुसऱ्या क्रमांकावर अदानी आहे. काही दिवसांपूर्वी अंबानी आणि अदानी यांच्यातील संपत्तीतील अंतर कमी आले होते. परंतु, गैरव्यवहाराच्या शक्यतेने अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे समभाग गडगडले. अदानी ग्रुपचे बाजारमूल्य या आठवड्यात 13.2 अब्ज डॉलरने घसरुन 63.5 अब्ज डॉलरवर आले आहे, असे ब्लूम्बर्ग बिलियनेयर्स इंडेक्सने म्हटले आहे. 

अदानी ग्रुपमध्ये करण्यात आलेली 43 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ही गुंतवणूक करणाऱ्या तीन बड्या गुंतवणूकदारांची खाती नॅशनल सिक्युरिटीज डिपॅाझिटरी लिमिटेड (NSDL) ने गोठवली आहे. ही बातमी शेअर बाजारात पसरल्यानतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांना मोठा झटका बसला होता. 

अब्दुला इन्व्हेस्टमेंड फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंड फंड या तीन परदेशी फंडांची खाती गोठवण्यात आल्याचे समजते. ही कारवाई 15 दिवसांपूर्वीच झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत आज शेअर बाजारात ही माहिती पसरल्याने खळबळ उडाली. या तीन कंपन्यांची अदानी गुपमध्ये 43 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. मालकी हक्क आणि लाभार्थ्यांची माहिती लपवल्याने या कंपन्यांची खाती गोठवण्यात आल्याने त्यांना शेअरची खरेदी-विक्री करता येणार नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com