मोफत कोरोना लसीकरणाचा मुहूर्त महाराष्ट्रदिनाचा ठरला पण लस मिळणार नाही!

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्य सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे.
free covid vaccination drive in maharashtra will start from 1 may
free covid vaccination drive in maharashtra will start from 1 may

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. लशीच्या टंचाईमुळे 1 मेपासून सुरू होणारे हे कोरोना लसीकरण लांबणीवर पडले आहे. असे असले तरी उद्या (1 मे) महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या लसीकरण मोहिमेची औपचारिक सुरवात करणार आहेत. 

याविषयी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, उद्या महाराष्ट्रदिन साजरा होत आहे. त्यामुळे 1 मेपासून लसीकरण सुरू करावे, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा होती. यामुळे या लसीकरण मोहिमेची औपचारिक सुरवात आम्ही उद्या करीत आहोत. 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्ष वर्धन यांनी राज्यांच्या लसीकरणाच्या कामगिरीनुसार त्यांना लस वाटप केले जात आहे, असे म्हटले आहे. यावर बोलताना टोपे म्हणाले की, आम्ही दररोज 5 लाख नागरिकांना लस दिली आहे. आम्ही दररोज 13 लाख नागरिकांना लस देऊ शकतो एवढी आमची क्षमता आहे. आम्ही लसीकरणात प्रथम क्रमांकावर आहोत. 

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. या नागरिकांची संख्या सुमारे 5.71 कोटी आहे. यासाठी राज्य सरकारला कोरोना लशीचे 12 कोटी डोस लागणार आहेत. लस खरेदीसाठी राज्य सरकारला 6 हजार 500 कोटी रुपयांचा निधी खर्च करावा लागणार आहे.  या मोहिमेची औपचारिक सुरवात होत असली तरी लशीच्या टंचाईमुळे मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात अथवा मे महिन्याच्या अखेरीस हे लसीकरण सुरू होणार आहे. ही मोहीम पूर्ण होण्यासाठी तब्बल सहा महिने लागतील. 

18 वर्षांवरील व्यक्ती 1 मेपासून कोरोना लस घेण्यास पात्र आहेत. ते सरकारच्या को-विन प्लॅटफॉर्मवर आता नाव नोंदवू शकतात. नाव नोंदवल्यानंतर ते लसीकरण केंद्रावर जाऊन नियोजित वेळी लस घेऊ शकतात. केंद्र सरकारने सर्वांना लस देण्याची घोषणा केली. कोरोना विरोधात लढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com