माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेंचे हेलिकॉप्टर चार पक्षांत फिरुन अखेर राष्ट्रवादीत लँड!

माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश होतआहे. हा त्यांचा पाचवा पक्ष आहे.
former union minister subodh mohite will join ncp
former union minister subodh mohite will join ncp

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते (Subodh Mohite) यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  (NCP) आज प्रवेश होत आहे.  हा त्यांचा पाचवा पक्ष आहे. शिवसेना (Shivsena) व भाजपने (BJP) प्रवेश नाकारल्याने स्वाभिमानी शेतकरी पक्षात (Swabhimani Shetkari Paksha) त्यांनी प्रवेश केला होता. आता त्यांनी स्वाभिमानीला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीसोबत घरोबा करण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षातही ते किती दिवस राहतील, हे काही काळानंतरच स्पष्ट होणार आहे.

तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सुबोध मोहिते हे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री होते. राजकारणात येण्यापूर्वी युतीच्या कार्यकाळात ते भाजपचे मंत्री महादेवराव शिवणकर यांचे स्वीय सहाय्यक होते. शिवसेनेने 1998 मध्ये त्यांना रामटेक मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली. यात ते काँग्रेसचे बनवारीलाल पुरोहित यांचा पराभव करून विजयी झाले. 1999 मध्ये पुन्हा त्यांनी श्रीकांत जिचकार यांचा पराभव केला. याच काळात अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय मंत्री झाले.

नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत सुबोध मोहिते यांनी राजीनामा दिला. खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांना प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्षपद व काँग्रेसचे प्रवक्तापदही दिले. विधान परिषदेची उमेदवारीही त्यांना जाहीर झाली होती. परंतु, त्यांचे हेलिकॉप्टर हवेतच फिरत राहिल्याने ते मुंबईत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहचू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी जळगावच्या श्रीमती जैन यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली व त्या आमदार झाल्या. तेव्हापासून त्यांचे राजकीय हेलिकॉप्टर हवेतच घिरट्या घालत आहे. ते अद्यापही कुठेही स्थिर झाले नाही. काँग्रेसने त्यांना रामटेक विधानसभेच्या दोनवेळा उमेदवारी दिली. या दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला.

काँग्रेसमध्ये फारसे सक्रिय न राहिल्याने ते संघटनेतून बाहेर पडले. याच काळात त्यांनी पुन्हा 'मातोश्री'चे दरवाजे ठोठावले तसेच, नितीन गडकरींसोबतही ते काही काळ होते. परंतु, दोन्हीकडून नकार घंटा ऐकायला मिळाल्याने त्यांनी विनायक मेटे यांच्या पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला. या पक्षात विदर्भात कोणतेही अस्तित्व नसल्याने ते या पक्षात फार दिवस राहणार नाहीत, हे स्पष्ट होते. आता त्यांनी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी पक्षात प्रवेश केला. या पक्षाचाही पूर्व विदर्भात कुठेही झेंडा दिसत नाही. अशा पक्षाचे ते आता शिलेदार झाल्याने या पक्षात किती काळ राहतील, हा प्रश्न उपस्थित होत होता. आता ते स्वाभिमानीला रामराम करुन राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com