माजी कोळसा मंत्र्यांला अखेर कोळसाच भोवला...तीन वर्षे तुरुंगवास - Former Union Minister Dilip Ray sentenced to 3 years in jail in coal scam case | Politics Marathi News - Sarkarnama

माजी कोळसा मंत्र्यांला अखेर कोळसाच भोवला...तीन वर्षे तुरुंगवास

वृत्तसंस्था
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

झारखंडमधील कोळसा खाण वाटपात 1999 मध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्र्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 

नवी दिल्ली : कोळसा गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री दिलीप राय यांच्यासह तिघांना  केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. झारखंडमध्ये 1999 मध्ये कोळसा खाण वाटपात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. राय यांच्या वतीने जामिनासाठी अर्ज करण्यात येणार असून, या शिक्षेला आव्हान देण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांचे वकील मनू शर्मा यांनी दिली.   

विशेष न्यायाधीश भारत पराशर यांनी ही शिक्षा सुनावली. न्यायालयाने तिघांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणात कॅस्ट्रॉन टेक्नॉलॉजी लिमिटेडला (सीटीएल) 60 लाख रुपये आणि कॅस्ट्रॉन मायनिंग लिमिटेडलाही 10 लाखांचा दंड करण्यात आला आहे. कोळसा गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाने दिलीप राय यांच्यासह कोळसा मंत्रालयाचे तत्कालीन दोन वरिष्ठ अधिकारी प्रदीपकुमार बॅनर्जी आणि नित्यानंद गौतम, कॅस्ट्रॉन टेक्नॉलॉजी लिमिटेड (सीटीएल), सीटीएलचे संचालक महेंद्रकुमार अगरवाला आणि कॅस्ट्रॉन मायनिंग लिमिटेडला (सीएमएल) दोषी ठरवले होते.

राय यांना जन्मठेपेची शिक्षा करावी, अशी मागणी सीबीआयने न्यायालयात केली होती. सीबीआयने या प्रकरणात गुन्हेगारी कट आखणे, फसवणूक, विश्वासभंग, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह अनेक कलमांखाली आरोप ठेवले होते. झारखंडमधील गिरीध येथील ब्रह्मदिहा कोळसा खाण ही सीटीएल कंपनीला 1999 मध्ये देण्यात आली होती. या प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.  

दिलीप राय हे बिजू जनता दलाचे (बीजेडी) संस्थापक सदस्य आहेत. बिजू पटनायक यांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते. परंतु, नंतर त्यांनी बीजेडीला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.  ते 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर राऊरकेला येथून विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास करण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

भाजप सोडल्यानंतर राय हे बीजेडीमध्ये दाखल होतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, ते राजकारणापासून दूर राहिले. त्यांचा हॉटेल व्यवसाय असून, त्यावर त्यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली होती. आता कोळसा गैरव्यवहार प्रकरणी त्यांना तीन वर्षांची शिक्षा झाली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख