मला कोरोना पॉझिटिव्ह करुन मारण्याचा नितीशकुमारांनी कट आखलाय! - former mp and jap chief pappu yadav slams bihar chief minister nitish kumar | Politics Marathi News - Sarkarnama

मला कोरोना पॉझिटिव्ह करुन मारण्याचा नितीशकुमारांनी कट आखलाय!

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 मे 2021

भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या तीसहून अधिक नव्या रुग्णवाहिका धूळ खात पडून असल्याची बाब पप्पू यादव यांनी समोर आणली होती. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Corona) रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, मृत्यूचे आकडे आता विक्रमी पातळीवर पोचले आहेत. भाजप (BJP) खासदार राजीव प्रताप रुडी (Rajiv Pratap Rudy) यांच्या तीसहून अधिक नव्या रुग्णवाहिका धूळ खात पडून असल्याची धक्कादायक बाब जन अधिकार पक्षाचे अध्यक्ष व माजी खासदार पप्पू यादव (Pappu Yadav) यांनी समोर आणली होती. यावर आता लॉकडाउनचे नियम तोडल्याबद्दल यादव यांना अटक करण्यात आली असून, यावरुन बिहारमधील  (Bihar) राजकीय वातावरण तापले आहे.  

पप्पू यादव यांनी यावरुन थेट मुख्यमंत्री नितीशकुमार यांना इशारा दिला आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, नमस्कार नितीशजी, माझ्या धैर्याची परीक्षा घेऊ नका अन्यथा जनता कायदा हातात घेईल. त्यावेळी तुमचे सारे प्रशासन लॉकडाउन विसरून जाईल. एक महिन्यापूर्वीच माझे ऑपरेशन झाले आहे, तरीही मी माझे आयुष्य डावावर लावून इतरांचे जीव वाचवत आहे. आताच माझी चाचणी झाली असून, ती निगेटिव्ह आली असून, मला पॉझिटिव्ह करुन मारण्याची तुमची इच्छा दिसते. 

सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी करायला हवी. परंतु, ते पप्पू यादवशी लढत आहेत. माझ्यासोबत मदत करण्यात आणि जीव वाचवण्यात स्पर्धा करा. मला अडकवून तुरुंगात टाकण्यासाठी वेळ कशासाठी वाया घालवत आहात, असे पप्पू यादव यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा : तरुणीला एकाचवेळी दिले कोरोना लशीचे सहा डोस 

बिहारमधील सारण येथील भाजपचे खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या रुग्णवाहिका पडून आहेत. त्यांनी खासदार निधीतून खरेदी केलेल्या या रुग्णवाहिका आहेत. रुडी यांच्या मालकीच्या जागेवर या रुग्णवाहिका झाकून ठेवण्यात आलेल्या होत्या. बिहारमध्ये अनेक रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नसल्याचे चित्र आहे. याचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका धूळ खात पडून असल्याचे पप्पू यादव यांनी समोर आणले होते. 

यामुळे सरकारने त्यांच्यावर लॉकडाउनच्या नियमांचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी जन अधिकार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. विशेष म्हणजे, राज्यातील संयुक्त जनता दल आणि भाजप सरकारमधील घटक पक्षांनी यावर टीका केली आहे. हिंदुस्तान आवामी महज आणि विकासशील इन्सान पार्टी या दोन पक्षांनी या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख