पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक यांना कोरोनाची लागण  - Former MLA of Pandharpur Sudhakar Paricharak contracted corona virus | Politics Marathi News - Sarkarnama

पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक यांना कोरोनाची लागण 

भारत नागणे
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

माजी आमदार सुधाकर परिचारक आणि त्यांच्या बंधूंना दोन दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर त्यांची रॅपिड अँटिजेन चाचणी केली होती. त्यामध्ये हे दोन्ही परिचारक बंधू कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत

पंढरपूर : एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक (वय 84) यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. त्यांच्या सोबत त्यांचे बंधू आणि प्रशांत परिचारक यांचे वडिलही पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यांना दोन दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. दक्षता म्हणून या परिचारक बंधूंना पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

माजी आमदार सुधाकर परिचारक आणि त्यांच्या बंधूंना दोन दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर त्यांची रॅपिड अँटिजेन चाचणी केली होती. त्यामध्ये हे दोन्ही परिचारक बंधू कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. त्यानंतर घरातील इतर लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून आलेल्या अहवालात पंढरपूर शहरातील 38, तर ग्रामीण भागातील 31 असे एकूण 67 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्‍यातील भोसे गावात 21 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत शहरात जवळपास 750 हून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 350 रुग्ण बरे झाले आहेत. उर्वरित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

पंढरपूर शहरातील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने आजपासून (ता. 7 ऑगस्ट) पुढील सात दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला आहे. आज पहिल्या दिवशी पंढरपूर शहरात कडकडीत लॉकडाउन पाळण्यात आला आहे. येत्या 13 ऑगस्टपर्यंत हा लॉकडाऊन सुरु राहणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख