कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले 'आयएमए'चे माजी अध्यक्ष कोरोनाशी झुंज हरले - former ima president k k aggarwal dies of covid 19 complications | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले 'आयएमए'चे माजी अध्यक्ष कोरोनाशी झुंज हरले

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 मे 2021

देशातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, मृत्यूचे आकडेही वाढत आहेत. आता ख्यातनाम डॉक्टर व आयएमएच्या माजी अध्यक्षांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19)  रुग्णसंख्येतील (Patients) वाढ सुरूच असून, मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आता इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) माजी अध्यक्ष व ख्यातनाम डॉक्टर के.के.अगरवाल (K K Aggarwal) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे डॉ. अगरवाल यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले होते. 

डॉ. अगरवाल यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून ते मागील काही दिवसांपासून दिल्लीतील अखिल  भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल होते. काल (ता.17) रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले होते. ते काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. त्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले होते. डॉ. अगरवाल हे हृदयविकार तज्ञ होते आणि हार्ट केअर फाउंडेशनचे ते प्रमुख होते. 

याबाबत डॉ. अगरवाल यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, डॉक्टर बनल्यापासून त्यांनी समाजाप्रती आयुष्य समर्पित केले होते. आरोग्याविषयी जागरुकता आणि लोकांचे जीवन सुधारावे यासाठी ते कायम काम करीत राहिले. कोरोना महामारीच्या काळातही ते लोकांमध्ये जागरुकता निर्माण करीत होते. अनेक व्हिडीओ आणि शैक्षणिक कार्यक्रमांमधून 10 कोटीहून अधिक लोकांपर्यंत पोचून त्यांनी अनेकांचा जीव वाचवले. 

हेही वाचा : भारतात दर मिनिटाला तीन जणांचा कोरोनामुळे जातोय जीव  

कोरोना लस घेण्याआधी आठवडाभर आणि घेतल्यानंतर आठवडाभर मद्य टाळावे, असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला होता. त्यानंतर त्यांनी कोरोना लशीविषयीचा प्रश्नोत्तराचा व्हिडीओ शेअर करीत शंकासमाधान केले होते. सोशल मीडियावर त्यांना कोरोनाविषयी माहिती देणारे अनेक व्हिडीओ पोस्ट केले होते. ते रुग्णालयात दाखल असतानाही त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरुन हे काम सुरूच होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अगरवाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

देशात 24 तासांत 4 हजार 329 मृत्यू 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2 लाख 63  हजार 533 नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 329 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 52 लाख 28 हजार 996 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 78 हजार 719 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून 21 एप्रिलनंतर कालपासून (ता.17 मे) रोजची रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. तरीही मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख