सीबीआय छाप्यांवर अनिल देशमुखांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली अन् म्हणाले... - former home minister anil deshmukh says he is cooperating with cbi | Politics Marathi News - Sarkarnama

सीबीआय छाप्यांवर अनिल देशमुखांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली अन् म्हणाले...

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 एप्रिल 2021

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापे टाकले असून, या घटनेचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. 

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापे टाकले असून, या घटनेचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने या कारवाईचा निषेध केला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेही या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. आता अनिल देशमुख यांनी पहिल्यांदाच या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. 

अनिल देशमुख आज सायंकाळी निवासस्थानातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांना सीबीआयच्या कारवाईबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर आम्ही सीबीआयला सहकार्य करीत आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. नागपूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जात आहे, असेही देशमुख यांनी सांगितले. देशमुख यांनी सीबीआयच्या कारवाईबाबत इतर माहिती मात्र, दिली नाही.  

राष्ट्रवादी काँग्रेसनेही या कारवाईचा निषेध केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली. उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्याप पर्यंत ऐकिवात नाही. 

अँटिलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो, असे पाटील यांनी म्हटले आहे. 

अनिल देशमुख यांचा बचाव करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सीबीआय कारवाईच्या विरोधात आक्रमकपणे उत्तर देण्याचे पक्षाने ठरविले आहे. त्यानुसार पाटील यांनी या कारवाईचा निषेध करत हे बदनामीचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे इतर नेतेही या कारवाईच्या विरोधात आवाज उठवत आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनीही या कारवाईच्या विरोधात आवाज उठवला आहे. 
राऊत म्हणतात, दया..कुछ तो गडबड है

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देशमुखांवरील कारवाईबाबत शंका उपस्थित करताना लोकप्रिय सीआयडी मालिकेतील संवादाचा वापर केला आहे. राऊत यांनी म्हटले आहे की, कुछ तो गडबड है. उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा, असे सीबीआयला सांगितले होते. अनिल देशमुखांवर धाडी, एफ.आय. आर.वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही. दया..कुछ तो गडबड जरूर है.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख