Former DGP of Bihar Gupteshwar Pandey may get ticket from bjp
Former DGP of Bihar Gupteshwar Pandey may get ticket from bjp

जेडीयूने तिकिट नाकारलेल्या गुप्तेश्वर पांडेंना भाजपकडून उमेदवारी?

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बिहारचे निवृत्त पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांचे तिकिट कापण्यात आले असून, त्यांची आशा आता भाजपवर आहे.

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आक्रमक भूमिका घेणारे बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी संयुक्त जनता दलात (जेडीयू) प्रवेश केला होता. पांडे हे मूळचे बक्सर भागातील असल्याने त्यांना तेथून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, तेथील दोन्ही मतदारसंघ जागा वाटपात भाजपकडे गेल्याने जेडीयूने त्यांना तिकिट नाकारले आहे. भाजपने या दोन्ही मतदारसंघात अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे पांडे यांनी भाजपकडून उभे केले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सुशांत मृत्यू प्रकरणात बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर गुप्तेश्वर पांडे यांनी अचानक स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली होती. त्यांचा अर्ज तातडीने राज्य सरकारने मंजूर केला होता. मुख्यंत्री नितीशकुमार यांच्या उपस्थितीत त्यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. नितीशकुमार यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला होता. सुशांत प्रकरणी त्यांनी घेतलेली भूमिका अखेर त्यांच्यासाठी लाभदायी ठरल्याचे चित्र होते.   

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  गुप्तेश्वर पांडे हे मूळचे बक्सरमधील आहेत. त्यामुळे त्यांना बक्सर भागातील बक्सर आणि ब्रह्मपूर या मतदारसंघांतून उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. मात्र, हे दोन्ही मतदारसंघ जागा वाटपात भाजपकडे गेले आहेत. यामुळे पांडे यांचे तिकिट कापले गेले आहे. इतर मतदारसंघातून पांडे यांना तिकिट मिळण्याची आशा आहे. मात्र, तेथून निवडणूक लढण्यास पांडे तयार नाहीत. 

भाजपने बक्सर आणि ब्रह्मपूरमधून अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. पांडे हे आता भाजपकडून तिकिट मिळवण्यासाठी पाटण्यापासून दिल्लीपर्यंत हेलपाटे मारत आहेत. या दोनपैकी एका मतदारसंघातून तिकिट मिळवण्याचा आटापिटा पांडे यांच्याकडून  सुरू होता. त्यामुळे त्यांची आशा आता भाजपवर अवलंबून आहे, असे सूत्रांनी सांगितले.  

पांडे यांनी तिकिट देण्यात भाजपसमोर काही अडचणी आहेत. कारण स्थानिक पातळीवरील बंडखोरीचा मोठा फटका तेथे पक्षाला बसू शकतो. बक्सर हा भाजप खासदार अश्विनी चौबे यांचा बालेकिल्ला आहे. नितीशकुमार यांच्या निष्ठावंताला भाजपकडून उभे करण्यास त्यांचा ठाम विरोध आहे. पांडे यांन तेथून तिकिट देणे चौबे यांना नंतर अडचणीचे ठरू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

बिहारमधील सत्तारुढ जेडीयू आणि भाजपने सुरुवातीला सुशांतचा मुद्दा तेथील राजकारणात उचलला. सुशांतला हा मूळचा बिहारचा असल्याने त्याला बिहारचा मुलगा असे संबोधण्यात आले. बिहारच्या मुलाला न्याय मिळायलाच हवा, अशा घोषणा देत जनभावनेला हात घालण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. बिहारमधील प्रचाराच्या रणधुमाळीत सध्या सगळीकडे सुशांतचे बॅनर आणि मास्क यामुळेच दिसत आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com