गुप्तेश्वर पांडेंची नवी इनिंग...खाकी सोडून खादीकडे

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात तीन केंद्रीय यंत्रणा तपास करीत आहेत. हा मुद्दा बिहारच्या विधानसभा निवडणुकीत केंद्रस्थानी असून, या प्रकरणी आक्रमक भूमिका घेणारे निवृत्त पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांची राजकीय इनिंग सुरू झाली आहे.
Former DGP of Bihar Gupteshwar Pandey to join JDU this evening
Former DGP of Bihar Gupteshwar Pandey to join JDU this evening

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या कहर वाढत असताना बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाच्या आघाडीविरोधात राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस यांची आघाडी असे चित्र दिसत आहे. आता अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करणारे बिहारचे निवृत्त पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी खाकी सोडून खादी परिधान करीत असून, त्यांची राजकीय इनिंग सुरू होत आहे. 

बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या घोषणेसोबतच बिहारमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. एकूण तीन टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), सक्त वसुली संचालनालय (ईडी) आणि अमली पदार्थ विरोधी विभाग (एनसीबी) या तीन केंद्रीय यंत्रणा करीत आहेत. सुशांतच्या मृत्यूचा मुद्दा बिहारमधील सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीय) आणि भाजपने लावून धरला आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपने या मुद्द्यावरुन मोहीम उघडली आहे. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्वत: सुशांत प्रकरणी लक्ष घातले होते. बिहारमध्ये नोव्हेंबरच्या सुमारास विधानसभा निवडणुका होत आहेत. कोरोना प्रार्दुभावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनने बिहारमधील मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मजूर त्यांच्या मूळ गावी पोचले आहेत. त्यांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न सरकारमोर आहे. याचवेळी राज्यात पुराने थैमान घातले होते. पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मदत आणि पुनर्वसनाच्या पातळीवर सरकार अपयशी ठरले आहे. यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी सरकार नवनवीन मुद्दे शोधत आहे. 

यामुळे बिहारमधील सत्तारुढ जेडीयू आणि भाजपने सुरुवातीला सुशांतचा मुद्दा तेथील राजकारणात उचलला. सुशांतला हा मूळचा बिहारचा असल्याने त्याला बिहारचा मुलगा असे संबोधण्यात आले. बिहारच्या मुलाला न्याय मिळायलाच हवा, अशा घोषणा देत जनभावनेला हात घालण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. बिहारमधील प्रचाराच्या रणधुमाळीत सध्या सगळीकडे सुशांतचे बॅनर आणि मास्क यामुळेच दिसत आहेत. 

गुप्तेश्वर पांडे यांनी अचानक स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली होती. त्यांचा अर्ज तातडीने राज्य सरकारने मंजूर केला आहे. आज सायंकाळी ते जेडीयूमध्ये प्रवेश करीत आहेत. सुशांत प्रकरणी त्यांनी घेतलेली भूमिका अखेर त्यांच्यासाठी लाभदायी ठरली आहे. मुख्यंत्री नितीशकुमार यांच्या उपस्थितीत त्यांचा जेडीयूमध्ये प्रवेश होईल. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com