सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार यांची आत्महत्या; नैराश्यातून उचलले पाऊल - Former CBI Director Ashwani Kumar Dies by Suicide | Politics Marathi News - Sarkarnama

सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार यांची आत्महत्या; नैराश्यातून उचलले पाऊल

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ते मणिपूर आणि नागालँडचे माजी गव्हर्नरही होते. 

शिमला : केंद्रीय अन्वेषण विभागाचे माजी संचालक अश्वनी कुमार यांनी आज राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते मणिपूर आणि नागालँडचे माजी गव्हर्नरही होते. त्यांनी नैराश्यातून आत्महत्येचे पाऊल उचलले, अशी माहिती सूत्रांनी दिली. कुमार यांच्या मागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. 

याला शिमल्याचे पोलीस अधीक्षक मोहित चावला यांनी दुजोरा दिला आहे. कुमार यांनी राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. कुमार हे 69 वर्षांचे होते. ही घटना उघडकीस येताच पोलीस आणि आरोग्य विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांना  तातडीने इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

कुमार हे मागील काही आठवड्यांपासून नैराश्यात होते. यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्टी पोलिसांना सापडली आहे. मी आता आयुष्याला कंटाळलो असून, पुढील प्रवासाला जात आहे, असा मजकूर चिठ्ठीत लिहिला होता. कुटुंबीयांना ही चिठ्ठी कुमार यांनीच लिहिल्याला दुजोरा दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

हिमाचल प्रदेशमधील नहान हे कुमार यांचे मूळ गाव होते. त्यांनी हिमाचल प्रदेश विद्यापीठातून पीएचडी मिळविली होती. ते हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक होते. ते या पदावर 2006 ते 2008 या काळात होते. नंतर सीबीआयमध्ये त्यांची संचालकपदी नियुक्ती झाली होती. ते सीबीआयमध्ये ऑगस्ट 2008 ते नोव्हेंबर 2010 या काळात होते. याचबरोबर ते स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्येही होते. कुमार यांनी 2013 मध्ये नागालँडचे 17 वे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला होता. त्याच वर्षी काही काळासाठी ते मणिपूरचेही राज्यपाल होते. निवृत्तीनंतर ते एका खासगी विद्यापीठाचे काही काळ कुलपती होते. 

देशभरात गाजलेल्या आरुषी तलवार प्रकरणाचा तपास कुमार यांच्या सीबीआयमधील कार्यकाळातच झाला होता. सीबीआयच्या संचालकपदी निवड होणारे ते हिमाचल प्रदेशमधील पहिले पोलीस अधिकारी होते. सीबीआयचा कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांनी आरुषी तलवार प्रकरणाच्या आधी झालेल्या तपासाला आक्षेप घेतला होता. यात आरुषीच्या पालकांना क्लीनचिट देण्यात आली होती. तपासासाठी त्यांनी पुन्हा दुसरे पथक नेमले होते. दुसऱ्या पथकाने केलेल्या तपासात आरुषीच्या आई-वडिलांचा सहभाग समोर आला होता. या प्रकरणी आरुषीच्या पालकांना सीबीआय न्यायालयाने 2013 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. परंतु, नंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांची मुक्तता केली होती.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख