केंद्रीय मंत्री अन् भाजपच्या प्रभारींची पक्षाच्याच नेत्याने जाहीर सभेत काढली लायकी - Former BJP MLA Achyutanand Singh criticizes party leaders in rally | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्रीय मंत्री अन् भाजपच्या प्रभारींची पक्षाच्याच नेत्याने जाहीर सभेत काढली लायकी

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असल्या तरी काही नेते स्वपक्षालाच घरचा आहेर देऊन खळबळ उडवून देत आहेत. 

पाटणा : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजपची प्रचार सभा..मंचावर मुख्यमंत्री नितीशकुमार उपस्थित..अशा वातावरणात भाजपचा एक नेता भाषणात आपल्याच पक्षाचा केंद्रीय मंत्री आणि प्रदेशाध्यक्षांची जाहीर लायकी काढतो. हाजीपूर येथील जाहीर सभेतील या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. 

भाजपचे नेते व माजी आमदार अच्युतानंदसिंह यांनी हा पक्षाला घरचा आहेर दिला आहे. अच्युतानंद हे तिकिट वाटपावरुन नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या उपस्थितीतच भाजप नेते व केंद्रीय मंत्री नित्यानंद राय आणि भाजपचे बिहार प्रभारी भूपेंद्र यादव यांची लायकी काढली. त्यांनी जाहीर भाषणात केलेल्या या टीकेमुळे मंचावरील नेत्यांनाही काही काळ काय करावे हे कळेनासे झाले होते. यावेळी भाजप आणि जेडीयूचे वरिष्ठ नेते मंचावर उपस्थित होते. 

ते म्हणाले की, मला तिकिट मिळाले नाही त्यामुळे माझे समर्थक नाराज आहेत. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी यासाठी नाराज होऊ नये. मी पक्षाच्या चक्रव्यूहात फसलो असून, असहाय्य आहे. मी एवढा असहाय्य आहे की, भूपेंद्र यादव आणि नित्यानंद राय यांच्यासारख्या क्रूर नेत्यांचा प्रचार मला करावा लागत आहे. तुम्ही माझा सदरा काढून पाहिल्यास माझ्या छातीवर 'नितीशकुमार हे सगळ्या जगात चांगले' असे लिहिलेले आढळेल. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये एकूण 243 विधानसभा मतदारसंघ आहेत. 

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. काँग्रेस बिहारमध्ये 70 जागा लढवत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी 28 ऑक्टोबरला बिहारमध्ये दोन सभा घेणार आहेत. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जेडीयूच्या विरोधात त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख