परमबीर सिंग यांच्या जवळच्या पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या; दोन अधिकारी आधीच तुरूंगात

खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात नुकताच दाखल करण्यात आला आहे.
Five officers transfer by Mumbai Police commissioner after extortion alligations
Five officers transfer by Mumbai Police commissioner after extortion alligations

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Ex Mumbai CP Parambirsingh)  यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. खंडणी व फसवणुकीच्या गुन्ह्यात सिंग यांच्या जवळच्या दोन अधिकाऱ्यांना नुकतीच अटक करण्यात आल्यानंतर पाच अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यामुळं आता परमबीर सिंग यांच्यावरही कारवाई टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. (Five officers transfered by Mumbai Police commissioner after extortion alligations)

खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात नुकताच दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संजय पूनमिया (वय ५५) व सुनील जैन (वय ४६) या दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तर सिंग यांच्यासह उपायुक्त अकबर पठाण, पराग मणेरे, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, सिध्दार्थ शिंदे व पोलिस निरीक्षक आशा कोरके यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. हे अधिकारी सिंग यांच्या जवळचे मानले जातात.

या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी तातडीने त्यांची बदली केली आहे. या पाचही जणांची मुंबईतील नायगाव येथील सशस्त्र पोलिस दलात बदली करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर परमबीर सिंग यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना अटक झाल्याने परमबीरसिंगांनाही अटक होऊ शकते. आधी दाखल झालेल्या गुन्ह्यांत अटकेपासून बचाव करण्यात परमबीर सिंग यांना यश आले आहे. या गुन्ह्यात मात्र त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे सांगितले जात आहे.  

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी आपल्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी परमबीर सिंग व अधिकाऱ्यांनी खंडणी मागितल्याची तक्रार मरीन ड्राइव्ह पोलिसांकडे केली आहे. तक्रारीनुसार बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल आणि संजय पुनामिया यांनी भागीदारीत २००८ मध्ये दोन कंपन्या सुरू केल्या होत्या; मात्र दोघांमध्ये टोकाचे वाद झाल्याने ही भागीदारी २०११ मध्ये संपुष्टात आली. त्यानंतर संजय पुनामिया यांनी मुंबईसह इतर जिल्ह्यांत अग्रवाल यांच्याविरोधात १८ गुन्हे नोंदवले होते. 

२०१६ मध्ये संजय पुनामिया यांनी अग्रवाल यांच्याविरोधात ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्या वेळी अग्रवाल न्यायालयीन कोठडीत होते. नंतर पुनामियांतर्फे मनोज घटकर याला अग्रवाल यांचे पुतणे शरद अग्रवालकडे पाठवण्यात आले. घटकरने पुनामिया हे परमबीर सिंग यांचे आर्थिक व्यवहार पाहतात, अग्रवाल यांची गुन्ह्यांमधून सुटका करण्यासाठी त्यांनी पुनामिया व परमबीर सिंग यांना काही जागा विकाव्यात व १५ कोटी ५० लाख रुपये द्यावेत, असे घोटकरने सांगितले. तसे न केल्यास पुढील पाच वर्षे जेलमध्ये राहावे लागेल, अशी धमकीही त्याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या ३० मार्च रोजी संजय पुनामिया यांनी संबंधित मालमत्तेच्या करारावर जबरदस्ती शरद अग्रवाल यांच्या सह्या घेतल्या, तसेच उपायुक्त अकबर पठाण यांनाही पैसे द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर अकबर पठाण यांनीही ५० लाखांची मागणी केली. तसेच भाईंदरमधील दोन बीएचके फ्लॅट नावावर करण्यास धमकावले. तसे न केल्यास मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com