देवेंद्र फडणवीसही म्हणतात, नाथाभाऊंना राजकारण चांगले कळते... - fadnavis says nathabhau khadse know politics very well | Politics Marathi News - Sarkarnama

देवेंद्र फडणवीसही म्हणतात, नाथाभाऊंना राजकारण चांगले कळते...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

खडसे यांच्या पक्षांतराची चर्चा थांबेना!

जळगाव : नाथाभाऊ खडसे यांना राजकारण चांगले कळते. त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो योग्यच घेतील, असे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. जामनेर येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

जामनेर येथे एका गिरीश महाजन यांच्या जी. एम.फाऊंडेशन तर्फे उभारण्यात हॉस्पिटलचा शुभारंभ त्यांच्या हस्ते  करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ``नाथाभाऊ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना राजकारण चांगले कळते. त्यामुळे पक्षांतर करण्याबाबत ते जो निर्णय घेतील तो योग्यच असेल. मी जळगावात असलो तरी माझी त्यांची भेट झालेली नाही. या विषयावर आपण त्यांच्याशी बोललो नाही. परंतु वेळ आल्यावर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत.`` 

मंदिर उघडण्याबाबत राज्यपाल यांच्या पत्रावर मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी दिलेल्या पत्राच्या उत्तरावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. ठाकरे यांचे उत्तर दुर्दैवी असून राज्यात आघाडी सरकार असले हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या शिवसेना या आघाडीत आहे. त्यांच्या राज्यात मंदिरावर अन्याय होत आहे.

जामनेर येथे आमदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून ग्लोबल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे उद्घाटन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला खडसे यांना महाजनांनी निमंत्रण दिले होेते. मात्र आपण नाराज असल्याचे दाखवत फडणवीस यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर येण्याचे टाळले. खासदार सुभाष भामरे, उमेश पाटील, शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, माजी खासदार उल्हास पाटील हे प्रमुख या वेळी उपस्थित होते. स्वतः महाजन यांनी खडसे यांना निमंत्रण दिले होते. हा बिगर राजकीय कार्यक्रम असल्याने ते येतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती. मात्र न येऊन खडसेंनी आपण भाजप नेत्यांशी संवाद साधायला तयार नाही, असेच दाखवून दिले आहे. याचा राजकीय अर्थ काय निघणार यावर आता अटकळी सुरू आहेत. खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा अनेक दिवस सुरू आहे. खडसेंनी त्याविषयी थेट भाष्य केले नाही. मात्र भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला ते उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख