एक्झिट पोल : दक्षिणेत भाजपचा सुपडा साफ; केरळमध्ये डावे तर तमिळनाडूत द्रमुक - exit poll results of kerala tamil nadu and puducherry | Politics Marathi News - Sarkarnama

एक्झिट पोल : दक्षिणेत भाजपचा सुपडा साफ; केरळमध्ये डावे तर तमिळनाडूत द्रमुक

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 एप्रिल 2021

देशात चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले आहेत. 

नवी दिल्ली : देशात चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये दक्षिणेत भाजपचा सुपडा साफ होण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. तमिळनाडू द्रमुक-काँग्रेस आघाडी आणि केरळमध्ये डावी आघाडी सत्ता स्थापन करण्याचा अंदाज आहे. केवळ पुदुच्चेरीत भाजपचा सहकारी असलेला एनआर काँग्रेस सत्ता मिळवण्याची शक्यता आहे. 

तमिळनाडूत द्रमुकचा आवाज 
'एनडीटीव्ही'ने सर्व एक्झिट पोलची सरासरी काढून अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार, तमिळनाडूत विरोधी पक्ष असलेला द्रमुक सत्ताधारी बनेल. द्रमुक-काँग्रेस आघाडीला 171 जागा मिळतील. याचवेळी अण्णाद्रमुक- भाजप आघाडीला 58 जागा मिळतील. टी.टी.व्ही. दिनकरन यांच्या एएमएमके यांच्या पक्षाला 4 जागा मिळतील. तमिळनाडूत विधानसभेच्या एकूण 234 जागा आहेत. 

तमिळनाडूत सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भाजपची आघाडी आहे. या विरोधात द्रमुक आणि काँग्रेसची आघाडी आहे. माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांनी राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली आहे. त्यांचे पुतणे आमदार टी.टी.व्ही. दिनकरन यांनी मात्र, मागे न हटता निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. आता त्यांना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची साथ मिळाली आहे. त्यांच्या या आघाडीचा सर्वाधिक फटका सत्ताधारी अण्णाद्रमुकला बसण्याची चिन्हे आहेत. द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांच्या नावाला मुख्यमंत्रिपदासाठी पसंती मिळण्याची चिन्हे आहेत.  

केरळमध्ये डाव्या आघाडीचीच सत्ता 
एक्झिट पोलनुसार, केरळमध्ये डावेप्रणित लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ) आणि काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) यांच्या आघाडीत जोरदार टक्कर होणार आहे. एलडीएफला 87 तर यूडीएफला 51 जागा मिळतील. भाजपला केवळ 2 जागा मिळतील. केरळमध्ये मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखाली एलडीएफची सत्ता असून, ते सत्ता ताब्यात ठेवतील. 

पुदुच्चेरीत एनआर काँग्रेसला हात 
केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहुमत गेल्याने काँग्रेसला सत्ता सोडावी लागली. त्यामुळे काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य निसटले. पुदुच्चेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणुक झाली आहे. राज्यात तीन नामनिर्देशित सदस्य असतात. 2016 मध्ये काँग्रेसने 19 जागा जिंकल्या होत्या. तर एआयएडीएमके व एनआर काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी 4 जागा मिळाल्या होत्या. भाजपचे तीन नामनिर्देशित सदस्य आहेत. एक्झिट पोलनुसार, पुदुच्चेरीत एनआर काँग्रेस-भाजप आघाडीला विजय मिळेल. या आघाडीला 18 जागा मिळतील. काँग्रेस आघाडीला 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

निवडणूक आयोगाकडून चारे राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. यात पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ ही चार राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका 27 मार्च ते 29 एप्रिल कालावधीत झाल्या आहेत. या पाच राज्यांपैकी सध्या केवळ आसाममध्येच भाजपची सत्ता आहे. पुदुच्चेरीमध्ये सरकार कोसळल्यानंतर आता काँग्रेसची पाचपैकी एकाही राज्यात सत्ता नाही. आसाममधील सत्ता टिकविण्यासह अन्य राज्यांत सत्तेत येण्यासाठी भाजपने जोर लावला  होता. मतमोजणी आणि निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख