कमलनाथ देणार जोतिरादित्यांना धक्का...पण शिवराजमामांची खुर्ची हलणार नाही! - exit poll predicts bjp will win 17 out of 28 seats in madhya pradesh bypolls | Politics Marathi News - Sarkarnama

कमलनाथ देणार जोतिरादित्यांना धक्का...पण शिवराजमामांची खुर्ची हलणार नाही!

वृत्तसंस्था
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

मध्य प्रदेशात मिनी विधानसभा ठरणार पोटनिवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी विरुद्ध काँग्रेस असा सामना आहे. 

भोपाळ : मध्य प्रदेशातील मिनी विधानसभा ठरलेल्या 28 मतदारंसघातील पोटनिवडणुकांत भाजपला 17 जागा मिळतील, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. यामुळे राज्यात काँग्रेसचे सत्तांतर करण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. काँग्रेस नेते कमलनाथ हे या निवडणुकीत भाजप नेते जोतिरादित्य शिंदेंना धक्का देण्यात यशस्वी ठरले तरी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानांच्या खुर्चीला मात्र, कोणताही धोका नसल्याचे एक्झिट पोलमध्य समोर आले आहे. 

मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला पोटनिवडणुका झाल्या. या पोटनिवडणुकांचा निकाल 10 नोव्हेंबरला लागणार आहे. जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 25 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता हे सर्व आमदार भाजपच्या तिकिटावर उभे असून, तीन मतदारसंघात विद्यमान आमदारांचे निधन झाल्याने पोटनिवडणुका झाल्या. 

एक्झिट पोलनुसार, भाजपला 28 पैकी 17 जागा मिळतील. काँग्रेसला 11 जागा मिळतील. याचा फटका जोतिरादित्य शिंदे यांचा समर्थक आमदारांना बसणार आहे. कमलनाथ हे जोतिरादित्य शिंदे यांना धक्का देण्यात यशस्वी ठरण्याची चिन्हे आहेत. मात्र, शिवराजसिंहाची खुर्ची हलेल हा एवढा मोठा धक्का असणार आहे, असेही चित्र दिसत आहे. 

राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपला केवळ 9 जागा हव्या आहेत. काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी पोटनिवडणुकीतील सगळ्या जागा जिंकाव्या लागतील. यानंतर राजकीय समीकरणे बदलू शकतात. कमलनाथ यांच्यावर आता मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. कारण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या 22 आमदारांना पराभूत करुन सत्त्तांतराचा वचपा त्यांना काढावा लागणार आहे. विधानसभेचे एकूण संख्याबळ 230 आहे. भाजपचे 107 आमदार असून, काँग्रेसचे 87, अपक्ष 4, बहुजन समाज पक्षाचे 2 आणि समाजवादी पक्षाचा 1 आमदार आहे.  

या पोटनिवडणुकांमुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण तापले होते. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली होती. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्नही कमलनाथ यांनी या निवडणुकीत केला होता.  

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख