या माजी मंत्र्यांना स्मारक समितीतून वगळा.. - Exclude Laxman Dhoble from Smarak Samiti | Politics Marathi News - Sarkarnama

या माजी मंत्र्यांना स्मारक समितीतून वगळा..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी होत असताना त्यांच्या नावाला विरोध करणारे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हे समितीत कसे ?

पुणे :"सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी होत असताना त्यांच्या नावाला विरोध करणारे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हे समितीत कसे ? त्यांना स्मारक समितीतून वगळा," अशी मागणी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींचे स्मारक धनगर समाजाच्या लोकवर्गणीतून करण्याचा घाट  कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी घातला आहे. या प्रकरणातील त्यांचे कामकाज संशयास्पद असल्याने त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे. अहिल्यादेवींचे स्मारक हे सरकारी निधीतून झाले पाहिजे," अशी भुमिका ढोणे यांनी मांडली आहे. याप्रकरणी आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

ढोणे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की "गेले दोन अडीच महिने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्रस्तावित स्मारकासंदर्भात राज्यभरातील धनगर समाजामध्ये चर्चा आहे. धनगर समाजाच्या लोकवर्गणीतून स्मारक उभा करण्याचे नियोजन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटाकाळात सर्वजण अस्तित्वाची लढाई लढत असताना कुलगुरू फडणवीस यांनी अत्यंत घाईगडबडीने स्मारक समिती स्थापन करून अनुषंगिक बैठका घेतल्या आहेत. त्यांनी मनमानी पद्धतीने ही प्रक्रिया राबवलेली आहे. 

काहींनी आक्षेप घेतल्यानंतर दोनवेळा या समितीचा विस्तार करण्यात आला आहे. पहिल्या समितीत विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचे प्राबल्य होते. त्यावेळी राज्य सरकारच्या यंत्रणेला पुर्णपणे बाजूला ठेवण्यात आले होते. नंतर पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांना समितीत घेण्यात आले. तसेच इतर पक्षांचे लोकही घेण्यात आले आहेत. आक्षेपार्ह बाब म्हणजे ज्या लक्ष्मण ढोबळे यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव द्यायला विरोध केला, तसेच जे महिला अत्याचार प्रकरणामुळे वादग्रस्त आहेत. त्यांना अहिल्यादेवींच्या स्मारक समितीवर सन्मानाने घेण्यात आले आहे. त्यामुळे यासंबंधीच्या प्रत्येक बाबीची पडताळणी गरजेची आहे," असे म्हटले आहे.

"कुलगुरू फडणवीस या स्मारकाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रात वाईट प्रघात पाडत असल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात हजारो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. जनतेची आर्थिक ससेहोलपट सुरू असताना त्यांनी धनगर समाजातून लोकवर्गणी काढून स्मारक पुर्ण करण्याचा घाट घातलेला आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारा, तसेच अहिल्यादेवी होळकर यांना एका जातीत बंदीस्त करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी राबवलेल्या प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे." असे ढोणे यांनी म्हटले आहे.

"अहिल्यादेवींचे स्मारक हे विद्यापीठ स्वनिधी किंवा राज्य सरकारच्या निधीमधूनच तयार करावे, अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या प्रस्तावाला तातडीने मंजूरी द्यावी. यासंदर्भात होत असलेल्या दिरंगाईची चौकशी व्हावी, विद्यापीठाला पायाभूत सुविधा तसेच मनुष्यबळासाठी आवश्यक तरतूद करावी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना स्मारक समितीतून तातडीने वगळण्यात यावे, या चार प्रमुख मागण्या असून त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशा चार मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

"ज्या अहिल्यादेवींनी लोकोद्धारासाठी कोट्यवधी रूपये खर्च केले. त्या अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी विद्यापीठ अथवा महाराष्ट्र सरकारकडे निधी नाही, हा प्रकार लांच्छनास्पद आहे. याउपर फक्त धनगर समाजाची वर्गणी डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत असलेले नियोजन जखमेवर मीठ चोळणारे आहे. त्यामुळे राज्य सरकारने याप्रश्नी तातडीने हस्तक्षेप करावा आणि अहिल्यादेवींची सुरू असलेली अवहेलना थांबवाबी. सध्या कोरोना संकट असल्याने आमचे प्रशासनाला सहकार्य आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल," असा इशाराही ढोणे यांनी दिला आहे.

Edited  by : Mangesh Mahale 
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख