तीन कारणांमुळे होतोय म्युकरमायकोसिस : 1) वाफ, 2) झिंक, 3) अँटिबायोटिक्स - excess use of zinc and antibiotics may be responsible for mucormycosis | Politics Marathi News - Sarkarnama

तीन कारणांमुळे होतोय म्युकरमायकोसिस : 1) वाफ, 2) झिंक, 3) अँटिबायोटिक्स

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 मे 2021

देशात कोरोनाचा कहर वाढत असून, यात आता नवीन आजाराची भर पडली आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा (Covid19) कहर वाढत असून, यात आता नवीन आजाराची भर पडली आहे. काळी बुरशी (Black Fungus) म्हणजेच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) हा जीवघेणा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे. या आजाराला कोरोना रुग्णांवर उपचारासाठी होणारा वाफ, अँटिबायोटिक्स आणि झिंकचा अतिवापर कारणीभूत ठरत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.  

म्युकरमायकोसिसचे रुग्ण वेगाने वाढू लागल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यांना हा साथीचा रोग जाहीर करण्याची सूचना केली होती. तसेच, या आजाराच्या रुग्णांचा आकडे केंद्राकडे सादर करण्यास सांगितले आहे. कोरोना संकटामुळे आधीच कोलमडून पडलेल्या आरोग्य व्यवस्थेसमोर आता म्युकरमायकोसिसचे आव्हान निर्माण झाले आहे. जगात इतर देशांच्या तुलनेत भारतात म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. 

याविषयी इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) माजी अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन म्हणाले की, कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वाफ, झिंक आणि अँटिबायोटिक्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. हे म्युकरमायकोसिसचे कारण असू शकते. याबाबत डॉ.व्ही.पी.पांडे यांनी 4 रुग्णालयांतील 210 कोरोना रुग्णांचा अभ्यास केला होता. यात हे तिन्ही घटक बुरशीच्या वाढीला कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे. 

हेही वाचा : बाप रे...एकाच रुग्णाला ब्लॅक, व्हाईट अन् यलो फंगसचा संसर्ग 

अँटिबायोटिक्सचे कॉकटेल म्हणजेच अझिथ्रोमायसिन, डॉक्सिसायक्लिन आणि कार्बापेनेम या तिन्ही औषधांचे एकत्रित सेवन केल्याने बुरशी संसर्गाचा धोका वाढत आहे. बुरशी ही झिंक जास्त असलेल्या वातावरणात वेगाने वाढते. यामुळे शरीरातील मॅमिलियन सेल्स या झिंकला दूर ठेवून बुरशी संसर्गाला टाळतात. याचबरोबर जास्त प्रमाणात वाफ घेतल्याने म्युकस लेयरला हानी पोचत आहे. यामुळे तेथे बुरशी संसर्ग होण्यास अधिक वाव मिळत आहे. भारतात आधी सापडणाऱ्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये म्युकोसाच्या आजूबाजूला वाफेमुळे भाजल्याने संसर्ग झालेले रुग्णांचे प्रमाण 10 ते 20 टक्के होते. 

केंद्रीय रसायने व खते मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात आजपर्यंत म्युकरमायोसिसचे 11 हजार 717 रुग्ण आढळले आहेत. यात गुजरातमध्ये सर्वाधिक 2 हजार 859 रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्रात 2 हजार 770 रुग्ण सापडले आहे. आंध्र प्रदेशात 768 रुग्ण आढळून आले आहेत. देशातील म्युकरमायकोसिसच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण या तीन राज्यांत आहेत. दिल्लीतही याची रुग्णसंख्या वाढत असून, आतापर्यंत 620 रुग्ण सापडले आहेत. 

म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्यानंतर योग्य उपचार न मिळाल्यास रुग्ण काही दिवसांत दगावतो. हा आजार संसर्गजन्य नसल्याचे 'सीडीसी'चे म्हणणे आहे. भारतात या आजाराचे दरवर्षी सुमारे डझनभर रुग्ण सापडतात. सर्वसाधारणपणे शरीर अशा प्रकारच्या बुरशीला प्रतिकार करते. परंतु, प्रतिकारशक्ती कमकुवत असलेले याची शिकार होतात. अवयव प्रत्यारोपण करणारे आणि कर्करुग्णांमध्ये हा आजार आधी प्रामुख्याने आढळून येत होता. याआधी सार्सची साथ आली होती त्यावेळी या आजाराचे काही रुग्ण सापडले होते. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख