माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन - ex president pranab mukherjee passes away at hospital | Politics Marathi News - Sarkarnama

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

वृत्तसंस्था
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज निधन झाले. त्यांचे पुत्रे अभिजीत मुखर्जी यांनी ही माहिती दिली आहे. 

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्यावर  रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज प्रणव मुखर्जी यांचे उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले. मुखर्जी हे 84 वर्षांचे होते. 

प्रणव मुखर्जी यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र अभिषेक मुखर्जी यांनी ट्विटवर दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझे वडील प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले आहे. आर आर रुग्णालयातील डॉक्टरांनी माझ्या वडिलांनी वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना केली होती. याबद्दल मी सर्वांचे मी आभार मानतो.   

मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान  झाले होते. याची माहिती त्यांनीच ट्विटरवर दिली होती. त्यांनी म्हटले होते की, मी रुग्णालयात तपासणीसाठी गेलो होतो. त्यावेळी माझी कोरोना चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मागील आठवड्यात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विनंती आहे की त्यांनी स्वत: विलगीकरणात राहावे.

मुखर्जी यांच्या मेंदूत गाठ आढळून आली होती. त्यामुळे त्यांच्या मेंदूवर 10 ऑगस्टला तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीत अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नव्हती. त्यांची प्रकृती उलट ढासळली होती. ते व्हेटिंलेटरवर होते. 

मुखर्जी हे लवकर बरे व्हावेत यासाठी पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील त्यांच्या मूळगावी किरनहर येथे प्रार्थना करण्यात आली होती. गावातील नागरिकांनी मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी 72 तासांचा यज्ञ सुरू केला होता. या पूजेत मुखर्जी यांचे कुटुंबीयही सहभागी झाले होते. मुखर्जी हे नित्यनेमाने दरवर्षी दुर्गापूजेसाठी किरनहरला भेट देत असत. किरनहरपासून काही किलोमीटर अंतरावर मुखर्जी यांच्या पूर्वजांचे गाव मिरीती आहे. तेथेही मुखर्जी यांचे कुटुंबीय पूजा करीत होते. 

मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी वडिलांच्या प्रकृतीबाबत नुकतेच ट्विट केले होते. माझ्या बाबांबाबत आता देवानेच योग्य तो निर्णय घ्यावा आणि तो स्वीकारण्यासाठी मला बळ द्यावे,  असे त्यांनी म्हटले होते. त्यांनी म्हटले होते की, मागील वर्षी याचवेळी त्यांना भारतरत्न मिळाला होता. मागील वर्षीचा 8 ऑगस्ट हा माझ्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचा दिवस होता. आता वर्षानंतर 10 ऑगस्टला ते गंभीर आजारी पडले आहेत. ईश्वराने त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा आणि तो स्वीकारण्यास मला बळ द्यावे. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख