शिवराजसिंह अन् जोतिरादित्यांना कमलनाथांचा मोठा धक्का - ex bjp mla parul sahu entered in congress in presence of kamal nath | Politics Marathi News - Sarkarnama

शिवराजसिंह अन् जोतिरादित्यांना कमलनाथांचा मोठा धक्का

वृत्तसंस्था
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान विरुद्ध कमलनाथ असा सामना रंगला आहे. राज्यात विधानसभा पोटनिवडणुका होणार असल्याचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. 

भोपाळ : मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुका नोव्हेंबर अखेरीस बिहारच्या विधानसभा निवडणुकीसोबत होत आहेत. आता भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील बड्या भाजप नेत्याला फोडून त्यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना पहिला दणका दिला आहे.  

भाजप नेते जोतिरादित्य शिंदे यांच्या ग्वाल्हेर या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शिंदे यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यातील तब्बल 16 ग्वाल्हेर भागातील आहेत. 

बुंदेलखंड भागातील भाजपच्या नेत्या व सागर मतदारसंघातील माजी आमदार पारूल साहू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सागर जिल्ह्यातील उद्योगपतींची कन्या असलेल्या साहू यांनी कमलनाथ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुरखी विधानसभा मतदारसंघातून साहू या 2013-18 आमदार होत्या. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि आताचे महसूल मंत्री गोविदसिंह राजपूत यांचा पराभव केला होता. त्यांना भाजपने 2018 च्या विधानसभा निवडणुकीत तिकिट नाकारले होते. 

राजपूत यांनी 2018 मध्ये भाजपचे उमेदवार सुधीर यादव यांचा पराभव केला होता. कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्रीच होते. मात्र, त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमवेत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना पुन्हा भाजपने मंत्रिपद दिले आहे. आता कमलनाथ यांनी आपल्याविरोधात बंड करणाऱ्या जोतिरादित्य आणि राजपूत यांना धक्का दिला आहे. साहू यांना काँग्रेसमध्ये आणून त्यांनी राजपूत यांच्यासमोर पोटनिवडणुकीत मोठे आव्हान निर्माण केले आहे.   

कमलनाथ यांनी सत्ताधारी भाजप राज्याची प्रतिमा मलिन करीत आहे, अशी टीका केली आहे. ते म्हणाले की, मध्य प्रदेश सरकारमधील प्रत्येक व्यक्ती विकली जाण्यास तयार आहे, असे दिल्लीत सगळेजण म्हणत आहेत. यामुळे मला दिल्लीत जाणेही आता लज्जास्पद वाटू लागले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख