गुड न्यूज : आता सगळ्यांना मिळणार कोरोना लस; 1 मेपासून सुरवात - everyone above the age of 18 to be eligible to get covid vaccine in india | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

गुड न्यूज : आता सगळ्यांना मिळणार कोरोना लस; 1 मेपासून सुरवात

वृत्तसंस्था
सोमवार, 19 एप्रिल 2021

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. 

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. आता केंद्र सरकारने कोरोना लसीकरणासाठी वयोमर्यादेची अट काढून टाकली आहे. यामुळे 18 वर्षांवरील सर्वांनाच कोरोना लस देण्यात येणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी केंद्र सरकारकडे ही मागणी केली होती. 

केंद्र सरकारने आज सर्वांना लस देण्याची घोषणा केली. कोरोना विरोधात लढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. यामुळे 18 वर्षांवरील सर्व व्यक्ती लस मिळण्यास पात्र ठरणार आहेत. त्यांना 1 मेपासून लस देण्यास सुरवात होणार आहे. 

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

देशात काल 2 लाख 73 हजार नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. तसेच, काल देशभरात 1 हजार 619 जणांचा काल कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत एकूण 1 कोटी 50 लाख 61 हजार 919 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 लाख 29 हजार 329 आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख