'सिरम'ची लस सुरक्षित अन् परिणामकारक; लशीवरील तात्पुरती बंदी अखेर मागे - european countries to resume astrazeneca corona vaccination | Politics Marathi News - Sarkarnama

'सिरम'ची लस सुरक्षित अन् परिणामकारक; लशीवरील तात्पुरती बंदी अखेर मागे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 मार्च 2021

युरोपीय देशांनी 'सिरम'च्या लशीचा वापर तात्पुरता थांबवला होता. तो आता पुन्हा सुरू होणार आहे. 

नवी दिल्ली : लस घेतल्यानंतर रक्तामध्ये गुठळ्या होत असल्याचे कारण देत अनेक बड्या युरोपीय देशांनी ऑक्सफर्ड व अॅस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचा वापर तात्पुरता थांबवला होता. कोव्हिशिल्डचे उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करीत आहेत. मात्र, या देशांनी आता ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याच निर्वाळा देत पुन्हा या लशीचा वापर सुरू केला आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिशिल्ड लस सुरक्षित असल्याचे सांगूनही युरोपातील अनेक देशांनी तिचा वापर थांबवला होता. काही देशांमध्ये ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचे प्रकार झाल्याचे समोर आले होते. यामुळे तेथे या लशीचा वापर तात्पुरता थांबवण्यात आला होता. युरोपमध्ये 50 लाख लोकांनी ही लस घेतली होती आणि त्यातील 30 जणांना त्रास झाला होती. याची तपासणी युरोपियन मेडिसीन्स एजन्सीकडून (ईएमए)  तपासणी सुरू होती. 

अॅस्ट्राझेनेकाची लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे. तिचा रक्ताचा गुठळ्या होण्याशी काहीही संबंध नाही, अशी घोषणा युरोपियन मेडिसीन्स एजन्सीने आज केली आहे. जागतिक आरोग्य संघटननेनही (डब्लूएचओ) ही लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे. यानंतर युरोपीय देश या लशीचा कोरोना लसीकरणासाठी पुन्हा वापर करण्यास सुरवात करणार आहेत. यात जर्मनी, फ्रान्स, स्पेन, इटली, नेदरलँड्स, पोर्तुगाल, लिथुआनिया, लॅटिव्हिया, स्लोव्हेनिया आणि बल्गेरिया या देशांचा समावेश आहे. 

आधी हॉलंड, आयर्लंड, डेन्मार्क, नॉर्वे या देशांनी या लशीचा वापर थांबवला होता. त्यानंतर जर्मनी, इटली, फ्रान्स या देशांनीही लशीचा वापर थांबला होता. त्यापाठोपाठ स्पेन, पोर्तुगाल, स्लोव्हानिया, लॅटिव्हिया या देशांनीही त्याचे अनुकरण केले होते. त्यामुळे जागितक स्तरावरील लसीकरण मोहिमेला धक्का बसला होता. आता ही लस सुरक्षित असल्याचे समोर आल्याने पुन्हा वेगाने लसीकरण सुरू होणार आहे. 

भारतात जानेवारीच्या मध्यापासून 3.6 कोटी जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. यात कोव्हिशिल्ड लशीचे प्रमाण अधिक आहे. भारतामध्ये अॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या कोव्हिशिल्ड या लशीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र, भारतात या लसीचे कोणतेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत. त्यामुळे भारतातील लसीकरण सुरक्षित असल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. भारतात कोव्हॅक्सिन या लसीचा वापरही होत आहे. दोन्ही लसींच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घेतली जात असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख